17 ऑगस्ट पासून शाळा सुरू नाही; शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती; टास्कफोर्सचा विरोध

0
261

शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली.

ज्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, मात्र सरसकट शाळा सुरु करता येणार नाही असं तज्ञांनी मत व्यक्त केलं. त्यामुळे येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडलेला दिसतोय. इतर राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांचे लसीकरण अथवा औषधेही उपलब्ध नसल्याने लगेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये असं टास्क फोर्सच्या तज्ञांनी सूचित केलं.

दोन दिवसांतच शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याने राज्य सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याची प्रतिक्रिया येत आहे. तसेच पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुद्धा या निर्णयांमुळे गोंँधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.