siddharth shukla death: बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

0
682

बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्पी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला रात्री औषध घेऊन झोपला होता. परंतु औषध कोणते घेतले होते, याबाबतची माहिती मिळालेली नाही आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने हिंदी टेलिव्हिजनला मोठा झटका लागला आहे.

बिग बॉस 13 मुळे सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला. त्यांची आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. दोघ काही दिवसांपूर्वी एकत्र बिग बॉस ओटीटीवर दिसून आले होते.

मनोरंजन विश्वात पदार्पण
१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.

तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर त्यांना ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.

सिद्धार्थची कारकीर्द
अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.