IND vs ENG : रोहितचं शतक, शार्दुलची अष्टपैलू कामगिरी; ओव्हलवर भारतानं रचला इतिहास

0
239

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा चौथा सामना लंडनच्या ओवल मैदानात खेळवला गेला. दोन्ही संघ पाच कसोटी मालिकांच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीत असताना. भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. अंत्यत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला १५७ धावांनी हरवले आणि ५० वर्षांचा दुष्काळ संपवला. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला २९१ धावांची गरज होती, शिवाय त्यांच्याकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता. पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त आक्रमण करत इंग्लंडच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडले. लंचनंतर खेळपट्टीने आपला रंग बदलला आणि जडेजासह बुमराहने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. १९७१मध्ये भारताने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात या मैदानावर शेवटचा कसोटीविजय नोंदवला होता. भारताने या विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर उमेश यादवने ३ गडी बाद केले. आता कसोटी मालिकेतील पाचवा सामना अनिर्णित किंवा भारताने जिंकल्यास मालिका जिंकणार आहे. तर इंग्लंडपुढे आता फक्त मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे त्यांना पाचवा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.

भारताने नवा इतिहास घडविला, जे गेल्या ५० वर्षात भारतीय संघाला करता आले नाही म्हणजेच इंग्लंडच्या ओवल मैदानात भारताला विजयाचा झेंडा रोवता आला नाही तो पराक्रम टीम इंडियाने केला. भारत (१९३६-२०१८) सालापासून १३ कसोटी सामने ओवल मैदानावर खेळला असून त्यात पाच सामन्यात पराभव तर सात सामने अनिर्नित ठरले आणि एका सामन्यात विजय मिळाला आहे. भारतीय संघाला १९७१ साली एकमात्र विजय या ओवल मैदानावर मिळवता आला. त्यानंतर ५० वर्षांनी हा सामना विजयी होऊन भारताने इतिहास घडविला आहे.

रोहित शर्माची तुफानी खेळी
चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले. रोहित नोव्हेंबर 2013 मध्ये कोलकाता येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर तो कसोटीत परदेशी भूमीवर शतक झळकावू शकला नाही. ही कमतरता रोहितने यावेळी इंग्लंडमध्ये सात वर्षानंतर (2021) मध्ये पूर्ण केली. रोहितने षटकार मारून कसोटीत शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे.

लॉर्ड शार्दुलची अष्टपैलू कामगिरी
इंग्लंडविरुद्ध सुरू ओव्हल कसोटी सामन्यात भारताच्या टॉपच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर गोलंदाज शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आला. पहिल्या डावात शार्दूलने मैदानावर तळ ठोकून टिच्चून फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. शार्दूलने 36 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत दमदार 57 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने कशीबशी 191 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावातही भारताचा डाव 350 धावांमध्ये संपुष्टात होईल असे वाटत असताना पुन्हा एकदा शार्दुल टीम इंडियासाठी धावून आला. दुसऱ्या डावात त्याने 72 चेंडूत 60 धावांची खेळी करत भारताला 400 धावांचा टप्पा पार करुन दिला.

फलंदाजीत शार्दुलच चमकलाच, त्यासोबत त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्याला केवळ एकच बळी मिळवता आला होता. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले.

जसप्रीत बुमराहचा नवा विक्रम

भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतासाठी एक नवा विक्रम केला आहे, जे आतापर्यंत मोठे मोठे दिग्गज गोलंदाज करु शकले नाही ते बुमराहने करुन दाखवले आहे. बुमराह भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. बुमराहने केवळ २४ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्यापेक्षा वेगवाने हा विक्रम आतापर्यंत कोणी करू शकलेला नाही. या विक्रमात बुमराहने मोठ्या नामवंत गोलंदाजांना मागे टाकले आहे. आता पर्यंत २४ सामन्यात १०२ विकेट्स त्याने पटकावल्या आहेत.

बुमराहने सर्वात वेगवान 5 विकेट घेण्याच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवलाही मागे टाकले आहे. कपिल देवने २५ कसोटी सामन्यांमध्ये १०० बळी घेतले होते, याशिवाय इरफान पठाणने २८ सामन्यांत १००, मोहम्मद शमीने २९ सामन्यात १००, जवागल श्रीनाथने ३० आणि इशांत शर्माने ३३ सामन्यात १०० बळी घेतले. पण आता जसप्रीत बुमराह या सर्व दिग्गज गोलंदाजांच्या पुढे आहे.