हक्कसोड प्रमाणपत्र म्हणजे नक्की काय?

    0
    701

    आपण नेहमी काहीतरी वेगवगेळे विषय तुमच्यासमोर घेऊन येत असतो. आजही असाच एक महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन आलो आहोत तो म्हणजे हक्कसोड प्रमाणपत्र म्हणजे नक्की काय? चला तर मग त्याबद्दलची माहिती घेऊया

    हक्कसोड पत्र नक्की आहे तरी काय?

    हक्‍कसोडपत्र म्‍हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्‍याही सदस्‍याने, सहहिस्‍सेदाराने, त्‍याचा त्‍या एकत्र कुटुंबाच्‍या मिळकतीवरील, स्‍वत:च्‍या हिस्‍स्‍याचा वैयक्‍तिक हक्‍क, त्‍याच एकत्र कुटुंबाच्‍या सदस्‍याच्‍या स्‍वेच्‍छेने आणि कायमस्‍वरुपी सोडून दिल्‍याबाबत नोंदणीकृत दस्‍त. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वारसा हक्काने मिळण्यास पात्र असलेल्या मिळकतीचा स्व-इच्छेने त्याग कागदोपत्री करणेचा कागद पत्रास (नोंदणीकृत करणे आवश्यक ) हक्क सोड पत्र असे संबोधिले जाते.

    ह्या दस्तांमधील “हक्कसोड पत्र” किंवा ज्याला इंग्रजीमध्ये “रिलीज डीड” म्हणतात ह्या प्रकारची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू.
    ह्या दस्ताच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की हक्क सोडण्यासाठी मिळकतीमध्ये हक्क असणे अभिप्रेत आहे. जेव्हा २ किंवा अधिक व्यक्तींना एकाच मिळकतीमध्ये हक्क असतो आणि त्यामधील कुठल्याही एका सहमालकाला त्याचा/तिचा हिस्सा हा अन्य सहमालकाच्या लाभामध्ये सोडून द्यायचा असेल, तेव्हा हक्क सोड पत्र दस्त बऱ्याच वेळा केला जातो. हक्कसोड पत्राला बरेचवेळा बहीण-भावाचा दस्त असे समजले जाते. कारण बहुतांशी वेळा बहिणींचा वडीलोपार्जित मिळकतींमधील हक्क भावांच्या लाभात सोडण्यासाठी ह्या दस्ताचा वापर केला जातो.

    हक्‍कसोडपत्र कोणाला करता येते ?
    एकत्र कुटुंबाचा कोणताही स्‍त्री अथवा पुरुष सदस्‍य, त्यासोबतचा हिस्‍सेदार हक्‍कसोडपत्र करु शकतो. एकत्र कुटुंबाचा कोणताही स्‍त्री अथवा पुरुष सदस्‍य किंवा सहहिस्‍सेदार फक्‍त वारसहक्‍काने मिळालेल्‍या किंवा मिळू शकणार्‍या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्‍वत:च्‍या हिस्‍स्‍याच्‍या मिळकतीपुरते हक्‍कसोडपत्र, त्‍याच एकत्र कुटुंबाच्‍या स्‍त्री अथवा पुरुष सदस्‍य किंवा सहहिस्‍सेदार यांच्‍या लाभात करु शकतो.

    हक्कसोड पत्र करताना मोबदला

    सर्वसाधारणपणे हक्‍कसोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्‍कसोडपत्र हे मोबदल्‍यासह पण असू शकते. मोबदल्‍यासह असणारे हक्‍कसोडपत्र त्‍याच एकत्र कुटुंबातील सदस्‍य किंवा सहहिस्‍सेदार यांच्‍या लाभात असल्‍याने त्‍यावर मुद्रांक शुल्‍क आकारले जात नाही तथापि हक्‍कसोडपत्र नोंदणीकृत असते त्‍यामुळे ते नोंदणी शुल्‍कास पात्र असते.

    हक्कसोड पत्राचे एक उदाहरण समजून घेऊया

    जेव्हा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित मिळकतीमधील आपला हिस्सा स्वतःच्या भावाच्या किंवा बहिणीच्या किंवा मुलगा/मुलगी ह्यांच्या लाभात किंवा जेव्हा मुलगा/मुलगी मयत असतील तर त्यांच्या मुला मुलींच्या म्हणजेच नातवंडांच्या लाभात , पण कुठल्याही प्रकारचा मोबदला न स्वीकारता सोडून द्यायचा असेल, तर फक्त २०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी वर हक्क सोड पत्र नोंदणीकृत करता येते. ह्या नाममात्र स्टॅम्पड्युटीसाठी वडिलोपार्जित मिळकत आणि विना-मोबदला ह्या दोन महत्वाच्या अटींची एकाचवेळी पूर्तता होणे आवश्यक आहे. इतर सर्व प्रकारच्या हक्क सोड पत्रासाठी मात्र खरेदीखतासारखीच संपूर्ण स्टॅम्प-ड्युटी भरावी लागते.

    हक्कसोडपत्रकाचा नक्की उपयोग काय असतो?

    हक्क-सोड पत्राचा उपयोग :
    हक्क-सोड पत्र नोंदणीकृत करून दिल्यावर दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील हक्क संपुष्टात येतो आणि लिहून -घेणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील मालकी हिस्सा त्या प्रमाणात वाढतो.

    हक्क सोडपत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. हा दस्त करण्यामागे देखील दस्त करणाऱ्या पक्षकारांची परस्परांबद्दलची आपुलकी अभिप्रेत असते. कधी कधी हक्क-सोड पत्रामागे “सोड-हक्क” अशी भावना असल्याचेही दिसून येते.

    हक्‍कसोडपत्र नोंदणीकृत असावे काय?

    होय, हक्‍कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्‍यावश्‍यक आहे अन्‍यथा त्‍याची नोंद सरकारी दप्‍तरात होणार नाही. हक्‍कसोडपत्र म्‍हणजे दान/बक्षीस पत्र. हक्‍कसोडपत्रामुळे हक्‍काचे हस्‍तांतरण होते. मालमत्ता हस्‍तांतरण अधिनियम, १८८२ कलम १२३ अन्‍वये असे दान/बक्षीस द्‍वारे झालेले हस्‍तांतरण नोंदणी झालेल्‍या लेखाने करणे आवश्‍यक असते.

    हक्‍कसोडपत्राच्‍या दस्‍तात खालील गोष्‍टी नमूद असाव्‍यात:

    हक्‍कसोडपत्राचा दस्‍त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
    हक्‍कसोडपत्राचा दस्‍त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
    एकत्र कुटुंबाच्‍या सर्व शाखांची वंशावळ .
    एकत्र कुटुंबाच्‍या मिळकतीचे हिस्‍सा निहाय विवरण.
    दोन निष्‍पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्‍वाक्षरी.