काय आहे निर्भया स्क्वॉड? काम कसे करणार?

0
529

सध्या बलात्कारासारख्या अमानुष घटना वाढत असून महिलांना किंवा मुलींना असुरक्षित वाटत असल्याची भावना आहे. महिलांविरोधातील सार्वजनिक ठिकाणी होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष स्क्वॉडची घोषणा केली आहे. निर्भया स्क्वॉडचा उद्देश हा गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करणे आहे. तसेच महिलांसाठी आदर निर्माण करणे हेदेखील निर्भया स्क्वॉडचे मुख्य उदिष्ट आहे.

काय आहे निर्भया स्क्वॉड?
प्रत्येक पोलिस स्टेशनच्या ठिकाणी निर्भया स्क्वॉडची निर्मिती केली जाईल. या स्क्वॉडमध्ये दोन महिला पोलिस अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबलचा समावेश असेल. त्या दोन कॉन्स्टेबलपैकी एक महिला कॉन्स्टेबल असेल. तसेच ड्रायव्हरचाही या स्क्वॉडमध्ये समावेश असेल. या स्क्वॉडला मोबाईल पॅट्रॉलिंग व्हॅन असेल. स्थानिक पातळीवर सर्व निर्भया पथक हे निरीक्षणाचे काम करेल. या स्क्वॉडसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी असेल.

या स्क्वॉडला दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे महिला हॉस्टेल, शेल्टर्स, चिल्ड्रन होम, अनाथाश्रम याठिकाणची माहिती मिळवत राहणे. तसेच महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्याचे हॉटस्पॉट शोधणे, पॅट्रोलिंग पॅटर्न निश्चित करणे, विद्यापिठ, खेळाची मैदाने, सिनेमागृहे, हॉल्स, गार्डन्स, मॉल्स, मार्केट अशा ठिकाणी गस्त घालणे हादेखील कामाचा महत्वाचा भाग असेल. तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या ठिकाणी मुलींना तक्रार नोंदवण्यासाठी निर्भया बॉक्सेसही उभारण्यात येतील.

रेकॉर्डवरील गुन्हेगार याची यादी तयार करणे, प्रत्येक महाविद्यालये, शाळा या ठिकाणी ’निर्भया पेटी’ लावण्यात येणार असून त्यात महिला आणि तरुणी आपल्या समस्या लिहून निर्भया पेटीत टाकतील. निर्भया पथक हे पेट्या उघडून त्यातील समस्यांचे निरसन करतील. तसेच स्क्वॉडकडे पेन कॅमेऱ्यासारखी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग डिव्हाईस असेल. त्यासाठीचे प्रशिक्षणही या स्क्वॉडच्या सदस्यांना देण्यात येणार आहे. स्क्वॉडकडे विशेष रजिस्टर देण्यात येणार आहे. ही डायरी नोडल ऑफिसरकडून वेळोवेळी तपासण्यात येईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्क्वॉडला पोलिस आयुक्तांकडून गौरविण्यात येईल.