महाराष्ट्रातील सिनेमागृह अखेर २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दिग्दर्शक, मुख्य सचिव, सिनेमागृहाचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात हॉटेल, विमानसेवा आणि सिनेमागृह सुरु करण्यात आली आहेत. तर आता थिएटर्स सुरु करण्यात यावेत अशी मागणी सिनेमागृहांच्या मालकांकडून करण्यात येत होती.
सिनेमागृहांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सिनेमागृह सुरु करण्यास अखेर परवानगी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. इतर सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांसाठीही खास नियमावली असेल.
सिनेमागृह सुरु करण्यात येणार असल्यामुळे कलाकार, सिनेमागृह आणि थिएटर्सवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आहे.