प्रतिक्षा संपली! ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
255

रणवीर सिंगचे (Ranveer Singh) चाहते त्याच्या ’83’ चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता परंतु कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. 83 हा भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांचा बायोपिक आहे. आता महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडण्याबरोबरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहितीही देण्यात आली आहे.

22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. यासह अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज रणवीरने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले आहे की 83 नाताळच्या निमित्ताने रिलीज होईल.

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ’83’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. ‘ती वेळ आली आहे… 83 हा चित्रपट ख्रिसमसमध्ये चित्रपटगृहामंध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन रणवीरने फोटो शेअर करत दिले आहे.

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट दिग्दर्शक कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तसेच भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे. रणवीरच्या या टीमने चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

दीपिका देखील दिसणार एकत्र

या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे तर दीपिका त्यांची पत्नी रोमीच्या भूमिकेत दिसणार आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हरवून विश्वचषक जिंकल्याची कथा चित्रपटात दाखवली जाईल. या चित्रपटाद्वारे प्रेक्षक पुन्हा एकदा इतिहासात घडलेले क्षण पुन्हा अनुभवतील.