जागतिक हृदय दिन: आनंदी,निरोगी आणि सशक्त जीवन जगण्याचा संकल्प करूया

0
1056

हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो.

जागतिक हृदय संघटना (World heart Federation, WHF) आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळाली (१९९९). जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (१९९७-९९) आंतोनियो लुना (Antonio Bayes de Luna) यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला.

उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार २४ सप्टेंबर २००० रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. सन २०११ पासून २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

जगाला व्यापून राहिलेल्या करोनाचा विळखा अजून सुटलेला नाही मात्र करोना बाधित लोकांमध्ये हृदयाचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे दिसून आले आहे. करोना मधून बरे झालेल्या अनेकांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचे दिसले आहे. अर्थात हृदय रोग होण्यामागे अनेक कारणे आहेत. अनियंत्रित जीवनशैली, अमली पदार्थ, सिगरेट सेवन, व्यायामाचा अभाव, ताण अशीही अनेक कारणे दिली जात असली तरी पूर्वी वयाने अधिक असलेल्या नागरिकात आढळणारा हृदय रोग आता मात्र तरुण वर्गात सुद्धा आढळू लागला आहे.

जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये व काय ध्यानात ठेवावे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.

लक्षणे ओळखा
शिड्या चढल्यामुळे किंवा पळल्यामुळे दम लागत असेल, छातीत डाव्या किंवा उजव्या बाजूला दुखत असेल तर ही हृदयरोगाच्या प्रारंभाची लक्षणे असू शकतात.

आखडल्यासारखे किंवा घशामध्ये कोंडल्यासारखे वाटणेही हृदयरोगाशी संबंधित आहे.

हे तातडीचे उपचार करा
तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला तर तत्काळ अँस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवून प्यायला हवी.

देखभाल
वयाची 30 वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्या. त्यात उच्च् रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेहाची तपासणी होते. त्यानंतर वर्षातून एकदा तपासणी आवश्य करा. कुटुंबात कोणाला हृदयरोग असेल तर धोक्याची शक्यता दुपटीने वाढते.

तर चला मग जागतिक हृदय दिन निमित्ताने आनंदी,निरोगी आणि सशक्त जीवन जगण्याचा संकल्प करूया…! Happy World Heart Day

हृदयरोगाविषयी जनजागृती करणे तसेच निरोगी हृदयासाठी काय काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती व्हावी यासाठी हा जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. यासाठी सकस आहाराचे सेवन करणे, नियमित अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. याशिवाय संगीत, योगसाधना व आपले छंद जोपासत तणावमुक्त राहणेही गरजेचे आहे.