आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन: काय आहे त्याचे महत्त्व?

0
761

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. बायबलचे अनुवादक सेंट जेरोम यांच्या स्मरणार्थ जागतिक अनुवाद दिन साजरा केला जातो. आजच्या काळात प्रत्येकाला प्रत्येक भाषेचे ज्ञान असणे शक्य नाही. पण आधुनिक काळात कोणतीही भाषा अनुवादाद्वारे सहज समजते. चला तर मग जागतिक अनुवाद दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊयात

जागतिक अनुवाद (भाषांतर) दिवस हा दरवर्षी ३० सप्टेंबरला बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक, संत जेरॉम यांच्या स्मृत्यर्थ साजरा केला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५३ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिकीकरणाच्या ह्या युगात लोकांना जागृत करण्यासाठी १९९१ मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन हा भाषा व्यावसायिकांच्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. जगातील राष्ट्रांना एकत्र आणण्यास, संवाद सुधारण्यास, समजून घेण्यास आणि सहकार्याने विकास करण्यात आणि जागतिक शांतता व सुरक्षा मजबूत करण्यात अनुवादकांची देखील महत्त्वाची भूमिका असते.

सर्वसामान्यांना समजेल असाा भाषेत तांत्रिक आणि वैज्ञानिक संकल्पना समजवून सांगणे अवघड असते. मात्र, कुशल अनुवादक किंवा भाषांतरकार हे काम उत्कृष्टपणे पार पाडतात. मूळ लेखन हे जगातील कुठल्याही भाषेत राहू शकते. मात्र, त्याचा दर्जेदार व परिणामकारक अनुवाद करण्यात भाषा व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या काळात तर अनुवादकांचे महत्त्व खूपच वाढले आहे. केवळ इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून चालत नाही. कारण, उद्योग व्यवसाय, व्यापार, शिक्षणात अग्रेसर असलेले देश जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत. आणि त्यांची मूळ भाषा इंग्रजी नाही. त्यामुळे कुठलीही दर्जेदार साहित्यकृती, वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी अनुवादकांशिवाय पर्याय नाही. आज जागतिकीकरणामुळे केवळ इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिशच नव्हे तर मँडरिन (चिनी), जपानी आणि हिंदी भाषेचे महत्त्व देखील वाढले आहे. त्यामुळे अर्थातच अनुवादकांचीही जबाबदारी वाढली आहे. आज अनुवादक म्हणून व्यवसाय करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी इंग्रजीशिवाय अन्य भाषांवर प्रभुत्व आवश्यक आहे.