टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारताचे हॉकी स्टार रुपिंदर पाल सिंग आणि बीरेंद्र लाकरा यांचा आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा

0
259

४१ वर्षांनी यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील दोन खेळाडूंनी गुरुवारी (३० सप्टेंबर) निवृत्ती जाहीर केली. भारतीय हॉकीपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते रुपिंदर पाल सिंग आणि बीरेंद्र लाकरा यांनी गुरुवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे खेळातून निवृत्ती जाहीर केली. रुपिंदर पाल सिंगने २००८ मध्ये भारतीय हॉकी संघासाठी खेळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने एकूण २२३ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर बीरेंद्र लकरा भारतीय संघासाठी २०१ सामने खेळला आहे. हॉकी इंडियाने ट्विटद्वारे त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.

पंजाबच्या फरीदकोटमध्ये जन्मलेल्या रुपिंदर पाल सिंगने दोन ऑलिम्पिकमध्ये (रिओ २०१६ आणि टोक्यो २०२०) भाग घेतला आहे तसेच आशियाई खेळ, आशिया कप, राष्ट्रकुल खेळ आणि हॉकी वर्ल्ड लीगमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. त्याची संपूर्ण कारकीर्द चमकदार राहिली आहे. ३० वर्षीय रुपिंदर पाल सिंगने भारताला टोक्यो २०२० मध्ये कांस्य पदक जिंकण्यास मदत केली. ४१ वर्षातील हे त्याचे पहिले ऑलिम्पिक पदक होते आणि तो याला आपले सर्वात मोठे यश मानतो. रुपिंदरने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन गोल केले, ज्यात जर्मनीविरुद्ध कांस्य पदकाच्या सामन्यादरम्यान निर्णायक पेनल्टी स्ट्रोकचा समावेश आहे.

ओडिशाच्या रुरकेला येथे रहिवासी असलेल्या बीरेंद्रने सेल हॉकी अ‍ॅकॅडमीमधून आपल्या हॉकी करिअरला सुरुवात केली. आपल्याच राज्यातील दिलीप टर्कीला आपला आदर्श मानणाऱ्या लाक्राने दिलीपला पाहातच हॉकीचे धडे गिरवले. २००९ मध्ये एफआयएच (FIH) ज्युनियर विश्वचषकासाठी सिंगापूरला गेलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्याने २००७ मध्ये पहिल्यांदा कनिष्ठ संघात पदार्पण केले. कनिष्ठ स्तरावर सातत्याने आपल्या कामगिरीतून छाप पाडणाऱ्या लाक्राला अखेर वरिष्ठ संघात स्थान मिळाले.

भारतीय पुरुष हॉकी संघाने २०१२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप २०१३ मध्ये रौप्य पदके जिंकली. या दोन्ही स्पर्धांमध्ये बीरेंद्र लाकरा संघाचा भाग होता. २०१४ मध्ये भारताने इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. येथेही लाकरा संघाचा भाग होता. याशिवाय तो जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत संघासोबत गेला. संघाने येथे कांस्यपदक पटकावले. त्याच्याकडे ऑलिम्पिक पदक नव्हते, पण यावर्षी जपानच्या राजधानीत खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचे हेही स्वप्नही पूर्ण झाले.

 

 

 

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1443505188019396613?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1443505188019396613%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fkrida%2Ftokyo-olympics-bronze-medal-winning-india-hockey-star-rupinder-pal-singh-and-birendra-lakra-retires-srk-94-2611097%2F