विदेशी फटाक्यांच्या विक्रीला बंदी; सार्वजनिक रस्त्यांवर, रात्री फटाके फोडण्यास प्रतिबंध, पुणे पोलिसांचे आदेश जारी

0
258

पुणे शहर पोलिसांनी दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी त्यांच्या कार्यक्षेत्रात फटाके विक्री आणि फटाके फोडण्याचे नवे नियम लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. पोलिसांनी दोरी गुंडाळलेल्या फटाक्याची विक्री म्हणजेच ज्याला सामान्यतः सुतली बॉम्ब म्हणतात त्याची विक्री करण्यास आणि फोडण्यास बंदी घातली आहे. तसेच सार्वजनिकपणे रस्त्यावर फटाके फोडण्यासही मनाई केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकराचे फटाके अथवा शोभेची दारू उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ज्या ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी ५० मीटरच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेच्या दारूची विक्री करता येणार नाही. शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना असलेल्या गोदामात किंवा घाऊक परवाना असलेल्यांकडे परत करणे आवश्यक असल्याचेदेखील नियमावलीत म्हटले आहे.

असे आहेत नियम…
ध्वनिप्रदूषण करणाच्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर प्रामुख्याने बंदी असणार आहे. १०५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या तसेच १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णतः बंदी असणार आहे. मात्र, जे फटाके आवाज न करता रंग निर्माण करतात, त्यांच्यावर बंदी नसेल. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये या शांतता प्रभागासभोवतालच्या १०० मीटरपर्यंत कोणत्याही फटाक्यांचा वापर करता येणार नाही. पोलिस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करून अपघात व धोका होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

फटाक्यांच्या विक्रीसाठी परवाने लागणार

पुणे पोलीस प्रशासनाकडून पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दिवाळीनिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी पोलिसांकडून परवाने वितरीत करण्यात येतील. 27 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीसाठी हे परवाने ग्राह्य असतील. मात्र, या कालावधीतही विक्रेत्यांना विदेशी फटाक्‍यांची विक्री करता येणार नाही.