Diwali 2021 : आज वसुबारस; या’ कारणांमुळे साजरा केला जातो हा दिवस

0
205

भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात दिवाळी सुरु होते ती ‘वसु-बारस’ या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. दिवाळीचा सण वसुबारसपासून सुरु होतो. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेती संपत्तीचा आधार असलेल्या गायींचा सन्मान करणे. विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी या दिवशी श्री कृष्णासोबतच गायीची पूजा करतात.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.

वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्सद्वादशी असे म्हणतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी तेला-तुपात तळलेले पदार्थ, गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सौभाग्यवती स्त्रिया गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारसला बछ बारसचे पर्व असेही म्हटले जाते. हे पर्व नंदिनी व्रत म्हणूनही साजरे केले जाते. कारण नंदिनी आणि नंदी (बैल) हे दोन्ही शैव धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. मुळात मानवांनी गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरु यांची एकत्रित पूजा केली जाते.