एसटी संप: का करत आहे एसटी कर्मचारी संप?

0
184

गेल्या आठवडाभरापासून राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सुरुवातीला संपाचा जोर कमी होता, मात्र दिवसागणिक अधिकाधिक एसटी डेपो बंद होत आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. ऐन दिवाळीत सुरू झालेला हा संप मागे घेतला जावा म्हणून न्यायालायनं मनाई आदेश जारी केला होता. मात्र, कामगार संघटनेनं हा आदेश धुडकावत संप सुरूच ठेवला.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू असल्याचं कर्मचार्‍यांनी सांगितले.

राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये एसटी महामंडळाच्या विलीनीकरण करण्याच्या संदर्भात कोणताही उल्लेख केला नाही, त्यामुळे आमचा हा संप असाच चालू राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

काय आहे संपाचा मुद्दा?
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळी ऐन तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करत संप मागे घेण्याचं आवाहन केलं.

पण राज्य सरकारच्या या घोषणेला काही तास उलटत असतानाच शेवगाव आगारात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर 4 नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांची एक संघटना पुन्हा संपावर गेली आणि काही आगारांमधलं कामकाज ठप्प झालं. एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असं हायकोर्टाने म्हटलं होतं.

गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे आणि कोव्हिड काळात लॉकडाऊन दरम्यान वाहतूक पूर्ण बंद असल्याने मार्च 2020 ते मार्च 201 या काळात एसटीचं 6300 कोटींचं उत्पन्न बुडलं.

या काळात कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते. या पार्श्वभूमीवर सध्या एसटी कर्मचारी आंदोलन करतायत.