IND vs NZ 2nd TEST : द्रविडच्या मार्गदर्शनाखाली कोहलीचा ‘विराट’ विजय; कसोटीत सर्वात मोठ्या विजयाची नोंद

0
197

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 325 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या न्यूजीलंच्या संघाला भारताने अवघ्या 62 धावांत रोखलं. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारताच्या फलंदाजांनी 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केली. आणि न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान न्यूझीलंडच्या संघाला पेलवलं नाही. न्यूझीलंडच्या संघ दुसऱ्या डावात 167 धावांमध्ये ऑल आऊट झाला. त्यामुळे भारताने मुंबई कसोटी 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. मयंक अग्रवालला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

तिसऱ्याच दिवशी किवींचा पराभव निश्चित

भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची खराब सुरुवात झाली. अश्विनने सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांना बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रॉस टेलर बाद झाला. मात्र, दुसरीकडे डॅरिल मिशेलनं संघाचा डाव सावरला आणि त्यानं 92 चेंडूत 60 धावा केल्या. परंतु, 35 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडल 37 व्या षटकात धावचीत झाला. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने पाच बळी गमावून 140 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचा पराभव निश्चित केला. भारतीय गोलंदाजांनी किवींचा पहिला डाव 62 धावांवर गुंडाळला होता.

ऐतिहासिक कसोटी

वानखेडे स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामना हा ऐतिहासिक ठरला. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने भारताच्या पहिल्या डावात सर्व 10 गडी बाद केले. अशी कामगिरी करणारा हा जगातील तिसराच गोलंदाज ठरला. पटेलने भारताच्या दुसऱ्या डावातही 4 गडी बाद केले. वानखेडे स्टेडियमवर कसोटीत सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला.

न्यूझीलंड 65 वर्षांपासून मालिका विजयाच्या प्रतीक्षेत

1956 पासून न्यूझीलंडचा हा 12 वा भारत दौरा होता. या दौऱ्यासह, उभय संघांमध्ये भारतात 37 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये किवी संघ केवळ दोन कसोटी जिंकू शकला आहे, तर 15 कसोटी सामने गमावले आहेत. यावरून न्यूझीलंडचा भारतातील रेकॉर्ड किती वाईट आहे हे स्पष्ट होते. न्यूझीलंडने 1988 मध्ये टीम इंडियाचा अखेरचा पराभव केला होता. न्यूझीलंडने भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. गेल्या 65 वर्षांपासूनची ही न्यूझीलंडविरोधातील विजयांची मालिका यंदादेखील कायम राखण्यात भारतीय संघाला यश आलं आहे