महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का: रुपालीताई पाटील यांचा मनसेला अखेर अलविदा

0
259

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या डॅशिंग नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील  यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा अनिल शिदोरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. रुपाली पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरे यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात त्यांनी दिलेल्या बळ आणि प्रेरणेसाठी आभार मानले आहेत. तसंच राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असंही म्हटलं आहे. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मी राजीनामा देताना वरिष्ठांना सांगितले की आहे की राज ठाकरे माझे दैवत होते आणि राहतील. पण मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर मी पुढे काय भूमिका घेणार आहे लवकर जाहीर करेल. काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यानंतर वरुण देसाई यांच्यासोबतही माझी भेट झाली. ती सदिच्छा भेट होती. त्यानंतर मी राजीनामा दिली आहे,” असे रुपाली पाटील म्हणाल्या.

हातात बाण की घड्याळ?
मागील 14 वर्षांपासून मनसेच्या रणरागिणी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रुपाली पाटील आता कोणत्या पक्षात जातील, याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीनी मी काम करत होते, त्या पद्धतीनीच मला जर राष्ट्रवादी किंवा शिवसेने स्वीकारलं तरच मी जाईन. मनसेच्या ज्या मुशीत मी वाढलीय, त्या पद्धतीनेच जे मला स्वीकारतील त्याच पक्षात मी प्रवेश करेन. अन्यथा सध्या तरी मी माझ्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने काम करत राहीन,” असं वक्तव्य रुपाली पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या दोन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करेन, असे संकेत रुपाली पाटील यांनी दिले. पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि शिवसेनेचे नेते वरुण देसाई यांचीही सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कोण आहेत रुपाली पाटील?

रुपाली पाटील ठोंबरे या मनसेच्या फायरब्रँड नेत्या आहेत. पुणे मनसेचा आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून त्या ओळखल्या जातात. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. तरुण-तरुणी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केलं. त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. 2017 मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी गरोदर असून गल्ली बोळात प्रचार करुन त्यांनी लक्ष वेधलं होतं. महत्त्वाचं म्हणजे प्रचारादरम्यानच त्यांना प्रसव वेदना झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी मुलाला जन्म दिला होता.

मनसेचा बुलंद आवाज

गेल्या काही वर्षांपासून रुपाली पाटील या मनसेचा पुण्यातील बुलंद आवाज बनल्या. पुण्यातील मनसेची कोणतीही आंदोलनं असो, सामाजिक कार्य असो त्यामध्ये रुपाली पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी होती.