World Tea Day : जागतिक चहा दिवस: चहा प्या आणि मस्त राहा

0
519

आज जागतीक चहा दिन…. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा.. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात… पण मर्त्य मानवाला अमृताचा लाभ कसा होईल? म्हणूनच मग अमृताशी पैजा जिंकणारा चहाच अमृततुल्य मानून पुणेकरांनी आपली कल्पकता दाखवली… आज जागतिक चहा (World Tea Day) दिवसाच्या निमित्तानं….

चहा या पेयाचा मूळ जन्म चीनमधला. अशी आख्यायिका आहे की, सुमारे पाच हजार वर्षापूर्वी एक थोर चिनी सम्राट चेन नुंग उन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या नोकर-चाकरांच्यासमवेत एका दूरच्या प्रवासाला निघाला होता. वाटेत विश्रांतीसाठी थांबला असता त्याच्या नोकराने त्याला उकळवलेले पिण्याचे पाणी दिले. अचानक आलेल्या वा-याच्या झोताबरोबर जवळच्या झुडपाची काही सुकलेली पाने त्या पाण्यात पडली. कुतूहलाने त्या सम्राटाने ते विशिष्ट सुगंधी आणि गडद तपकिरी रंगाचे पाणी चाखले. त्याला ती चव आवडली. आणि त्या क्षणीच ‘चहा’ हे पेय म्हणून जन्मास आले. त्यानंतर चहाच्या औषधी गुणांचाही शोध लागला. त्यानंतर चहा जगाच्या सफरीला निघाला आणि चहाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. चीनमध्ये चहा पिणे हे एक सांस्कृतिक कार्य असल्यासारखे पार पाडले जाते. आपल्याकडेसुद्धा घरात अथवा दुकानात मंडळी चहा घेत असतील आणि त्यावेळी कुणी आगंतुक आला तर त्याला चहाचा आग्रह केला जातो. म्हणूनच चहा हा माणसांना जोडणारा दुवा ठरतो. आपल्या दिनक्रमात चहा हा अविभाज्य घटक बनला आहे. मराठी भाषेत ‘चहा करणे’ म्हणजे स्तुती करणे, वाहवा करणे असाही वाक्प्रचार आहे.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने उत्पादनाची सुरुवात केली
16 व्या दशकापर्यंत लोकांनी चहाच्या पानांचा वापर भाजीच्या रुपात केला. तसेच, याला वाटून ते काळं पेय बनवून त्याचं सेवन करायचे. पण, 19 व्या शतकात भारतात याचं उत्पादन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केलं. त्यासोबतच, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बागही सुरु करण्यात आली. त्यानंतर चहाचं चलन वाढलं. आज देशातील अनेक भागांमध्ये चहाची शेती केली जाते.

भारतातील चहाची लागवड
आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण आसाममध्ये एकूण 43 हजार 292 चहाच्या बागा आहेत. 62 हजार 213 चहाच्या बागा निलगिरीमध्ये आहेत. तर दार्जिलिंगमध्ये 85 चहाच्या बागा आहेत

हवेत गारठा असताना मस्तपैकी गरमागरम चहाचे घोट घेण्यासारखे दुसरे सुख नाही. अगदी लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे हा आपला नेम असतो. चहाची वैशिष्ट्ये, त्याचे गुणदोष न पाहता आपण चहा पीत असतो.

चहा आणि मैत्रीची गट्टी

चहा हे एकट्याने पिण्याचे पेयच नाही. चहा आणि मैत्री यांची गट्टी आहे. चहा आणि मैत्री यावरच्या अनेक चारोळ्या प्रसिद्ध आहेत. ‘ज्या चहात साखर नाही, तो चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही, अशा जीवनात मजा नाही’ अशा चारोळ्यांचे साहित्यिक मूल्य चर्चेचा विषय ठरुही शकेल पण तेच अनेकांच्या व्हॉटसअ‍ॅपचे स्टेटस (Whats app Status) असते. चहामुळे मैत्र जमले आणि आपण चहाबाज झालो अशाच सर्वांच्या भावना असतात. चला रे जरा चहा मारुन येऊ..

असे म्हणत जमलेले चार-पाच मित्र-मैत्रिणी आणि चहाची टपरी हे अनेकांचे हळवे कोपरे असतात. मैत्रीचे वय वाढत जाते..चहाच्या टपरीचे रुपडेही बदलते..चहाची चव आणि प्रकारही बदलतात. आता तर चहाच्या कपाची साईजही बदलली आहे. पण वाफाळता चहा आणि मित्र-मैत्रिणींचा गप्पाचा रंगलेला फड याची लज्जत मात्र कधीही बदलणार नाही.