इम्पिरिकल डेटा म्हणजे काय? तो कसा गोळा केला जातो?

0
303

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्र मान्य करत इम्पेरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे.

इम्पेरिकल डेटामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि तो सदोष आहे. त्यामुळे तो देणं योग्य नाही. ही जातनिहाय जनगणना नव्हती. अनेक जातींची नावं चुकीच्या पद्धतीने नोंदवली गेली, असं केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. पण हा इम्पिरिकल डेटा म्हणजे नेमकं काय? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

इम्पिरिकल डेटा म्हणजे काय?
एखाद्या ठराविक समुदायाची विशिष्ट उद्देशानं गोळा केलेली अनुभवसिद्ध माहिती म्हणजे इम्पिरिकल डेटा होय. एखाद्या विषयाबद्दल वैयक्तिक मतं ग्राह्य न धरता केवळ ठोस माहितीच्या आधारे ही आकडेवारी गोळा केलेली असते. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने याचा विचार करता ओबीसी समाजाचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण सिद्ध कऱण्यासाठी मिळवलेली विश्लेषणात्मक माहिती म्हणजे इम्पिरिकल डेटा होय.

पहिल्या टप्प्यात प्राथमिक आणि उच्च शिक्षणात ओबीसींचं प्रमाण किती आहे, अशिक्षित किती आहेत, याचं सर्वेक्षण केलं जाईल. सरकारी आणि खासगी नोकरीमध्ये श्रेणींनुसार ओबीसींचं प्रमाण किती आहे याचा अभ्यास केला जाईल. शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ओबीसींचं प्रमाण कसं आहे, त्यांची घरं कशी आहेत, मध्यमवर्गीय किती आहेत अशा प्रकारची माहिती गोळा केली जाईल. समाजातील दिव्यांग आणि गंभीर आजारी व्यक्तींची माहितीदेखील मिळवली जाईल.

दुसऱ्या टप्प्यात ओबीसींसाठी राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या मतदारसंघातून किती ओबीसी उमेदवार विजयी झाले आहेत याची माहिती मिळवली जाते. ओबीसी लोकसंख्येशी याची तुलना करून राजकीयदृष्ट्या हा समाज किती मागासलेला आहे, हे सिद्ध होऊ शकेल.

इम्पिरिकल डेटा कसा गोळा केला जातो?
प्रत्यक्ष सर्वेक्षण, जनगणनेतून हाती आलेला डेटा, बाजारपेठेबद्दलची आकडेवारी या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळा करता येऊ शकतो.

इम्पिरिकल डेटा कसा गोळा करणार?
इतर राज्यांमध्ये ज्या ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण टिकले आहे. त्या राज्यांचा इम्पिरिकल डेटाचा आराखडा कसा होता? किंवा ज्या राज्यांचे आरक्षण कोर्टात टिकले नाही त्यांच्याकडून कोणत्या चुका झाल्या? याचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्यातून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी काही नवीन प्रश्नावली तयार करता येईल का? याचा अभ्यास केला जाऊ शकतो.