आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी; ११ जानेवारीपासून नवे नियम लागू!

0
811

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार, आता भारतात आल्यावर, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल तसेच आठव्या दिवशी त्यांची RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्राची ही मार्गदर्शक तत्त्वे 11 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

ओमायक्रॉनबाधित देशांमधील प्रवासी
दरम्यान, ज्या देशांचा समावेश भारतानं ओमायक्रॉन देशांच्या यादीमध्ये केला आहे, अशा देशांमधील प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तिथे करोनाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र, जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

विमानतळावर उतरल्यानंतर या प्रवाशांना त्यांच्या चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावं लागेल. त्यानंतरच ते त्यांच्या इच्छित स्थळी किंवा पुढच्या कनेक्टिव फ्लाईटसाठी जाऊ शकतील. जर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. आठव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. या चाचणीचा अहवाल त्यांना एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. संबंधित राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रशासन याची खात्री करेल.

याशिवाय प्रवाशांना त्यांचा नेगेटिव्ह RTPCR रिपोर्ट अपलोड करावा लागेल. प्रवासाच्या 72 तास आधी केलेली कोरोना चाचणीच वैध असेल. तसेच हा अहवाल खोटा किंवा खोटा असल्याचे आढळून आल्यास प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.