सवाई गंधर्व पुन्हा होणे नाही

0
382

सवाई गंधर्व महोत्सव हा दरवर्षी न चुकता पुण्यात होत असतो. असे खूप कमी कलाप्रेमी असतील ज्यांना सवाई गंधर्व महोत्सवबद्दल माहित नसेल बरोबर ना. पण असे खूप कमी तरुणाई असेल त्यांना सवाई गंधर्व नक्की कोण होते याबद्दल माहित नसेल. तर चला आज सवाई गंधर्वबद्दल माहिती घेऊया. 

सवाई गंधर्व यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी हुबळीजवळील कुंदगोळ गावी झाला. सवाई गंधर्व यांचे खरे नाव रामचंद्र गणेश कुंदगोळकर. रामचंद्र कुंडगोलकर  उर्फ पंडित सवाई गंधर्व हे प्रख्यात लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. ते किराणा घराणा शैलीतील सर्वात प्रख्यात मास्टर होते. 

रामचंद्र यांच्या  कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. शास्त्रीय संगीताचा अभ्यास पुर्ण झाल्यानंतर रामचंद्र म्हणजेच सवाई गंधर्व  एका नाटक कंपनीत गेले आणि थोड्याच कालावधीनंतर त्यांनी मराठी रंगभूमीमध्ये  स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना जसे लोक बालगंधर्व म्हणून ओळखायचे , तसेच आता येथेही रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. सवाई गंधर्व यांनी गायन केलेली मराठी नाट्यसंगीताची पद्य प्रसिद्ध झाली आहेत. 

सण १९०८ मध्ये सवाई गंधर्व यांनी  अमरावतीमधील ‘ नाटयकला प्रवर्तक मंडळी ’त  अभिनेता आणि गायक म्हणून प्रवेश केला व ते स्त्रीची भूमिका करू लागले. त्यावेळी बालगंधर्व यांच्या स्त्रीभूमिका अत्यंत लोकप्रिय असतानाही, रामचंद्र यांच्या रूपाने स्त्रीभूमिका करणारा एक नवा  अभिनेता -गायक रंगभूमीवर अवतरला व कमी कालावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या लोकप्रियतेमुळेच वऱ्हाडाचे नबाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे १९०८ साली त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली व या टोपण नावानेच ते पुढे जास्त ओळखले जाऊ लागले. 

सवाई गंधर्व ह्यांना विशेष ओळख मिळाली  तो हरिभाऊ आपटे यांच्या ‘संत सखू’ नाटकातील सखूच्या भूमिकेमुळे. या कौतुकाच्या पाठबळावर सवाई गंधर्व यांनी  स्वत:ची ‘नूतन संगीत नाटक मंडळी ’ स्थापन केली व ती पुढे दहा वर्षे चालविली. सवाई गंधर्व यांच्या चोवीस वर्षांच्या नाटयक्षेत्रात त्यांनी निभावलेल्या सुभद्रा, तारा, संत सखू, कृष्ण इ. भूमिका विशेष गाजल्या, तसेच ‘ बघुनी उपवनी ’, ‘ असताना यतिसन्निध ’, ‘ व्यर्थ छळिले ’अशी  अनेक नाटयकला  खूपच लोकप्रिय झाली. तुलसीदास नाटकामधील त्यांनी गायन केलेलं  ‘ राम रंगी रंगले मन ’ हे भजनही अतिशय लोकप्रिय झाले. सण १९३० नंतर संगीत नाट्य क्षेत्रातील  वाटचाल संपल्यावर सवाई गंधर्व शास्त्रीय संगीताच्या मैफलींकडे वळले. तेथेही  रंगभूमीवरील अनुभव क्षैली, कल्पनाशक्ती, गायनातील समृद्ध भावरंगपट आदी अलौकिक गुणांमुळे त्यांचा संगीताची किमया समृद्ध व प्रभावी ठरत असे.

हिंदुस्तानी शास्त्रीय रागसंगीताचा मूळ पाया  तसाच ठेवून  संगीत सादर करण्याच्या परंपरागत आणि विविध पद्धतींमुळे या संगीतात काही घराणी निर्माण झाली आहेत. त्यांपैकी किराणा (मूळ नाव कैराना) हे एक प्रमुख घराणे आहे.

 सवाई गंधर्व यांच्यामध्ये अष्टपैलू क्षैलीचे गुण सर्वाधिक उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या शिष्य परंपरेतील  संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहे. सवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी अजून एक प्रसिद्ध नाव म्हणजे पंडित भीमसेन जोशी. 

पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामचंद्र म्हणजेच सवाई गंधर्व यांच्या नावाने  ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि एका शिष्याकडून गुरुसाठी एक आगळी वेगळी भेट काय असते ते दाखवून दिले.  पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरु सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून इ.स. १९५२ मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना  डॉ. वसंतराव देशपांडे व पु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य लाभले.

सवाई गंधर्व पुन्हा होणे नाही

खरे तर एक युवा पिढी म्हणून आम्ही नक्कीच कमी नशीबवान आहोत. आता टीव्हीवर किंवा नाट्यक्षेत्रातील अभिनय संगीत पाहता सवाई गंधर्व यांच्या अभिनय आणि संगीतापुढे ह्यांचा कुठंही निभाव लागणार नाही हे नक्की.  सवाई गंधर्व यांचे संगीत-अभिनय पाहणे म्हणजे स्वर्गाचा अनुभव घेण्यासारखे असायचे असे आमचे आजी आजोबा सांगायचे. आज त्यांच्या विषयी लिहायला मिळणे हेच खूप मोठे भाग्य मला मिळालेय याचा मात्र मला आनंद होतोय.