राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय? त्याबद्दलचा निर्णय कोण घेतो?

0
198

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे. राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय त्याचे नियम कसे असतात यासंदर्भातील आढावा घेणार हा लेख…

राष्ट्रीय दुखवटा म्हणजे एका दिग्गज व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या विषयी शोक व्यक्त करण्यासाठी आणि त्याला आदरपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी केला जाणारा एक किंवा एकापेक्षा अधिक काळ दिवसांचा दुखवटा. देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेल्या किंवा केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यास राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. त्यासाठी तो आधी पूर्णपणे वरपर्यंत फडकावून नंतर अर्ध्यावर आणला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते.

राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो.

राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात देशातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतात.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या राष्ट्रध्वज फडकाविणाऱ्या पथकाला व कार्यालयाला तत्काळ सूचना देण्यात येतात.

कोण घेतं निर्णय?

केंद्र पातळीवर केंद्रीय गहमंत्रालय यासंदर्भातील निर्देश जारी करते. राज्यही त्यांच्या प्रदेशात शासकीय दुखवटा जाहीर करु शकतात. राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि दुखवटा जाहीर करण्यासाठी संबिधित निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या जातात?

– ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.
– राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.
– सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.
– शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.
– अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.