आयपीएल २०२२ लिलाव : ईशान किशन आणि दीपक चाहर साठी विक्रमी बोली; मुंबई आणि चेन्नईने मारली बाजी

0
137

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ च्या लिलावासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा सर्वच खेळाडू लिलावासाठी असल्यामुळे अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळत आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली लावली आहे. मुंबईने 15.25 कोटी रुपयांच्या बोलीवर इशान किशनला आपल्या ताफ्यात घेतलं.

इशान गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सचाच भाग होता. मात्र, या लिलावापूर्वी संघाने त्याला मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात सहभागी झाला होता. पण या लिलावातून मुंबईने आपला खेळाडू पुन्हा संघात परत घेतला आहे. विशेष गोष्ट अशी की मुंबईने इतिहासात पहिल्यांदाच लिलावामध्ये एखाद्या खेळाडूसाठी १० कोटींहून अधिक पैसे मोजले आहेत.

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात इशान किशनसाठी चांगलीच स्पर्धा झाली. १५ कोटींपर्यंत त्याची किंमत गेल्यानंतरही हे दोन्ही संघ माघार घेण्यास तयार नव्हते. मात्र, अखेर मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींच्या बोलीसह त्याला आपल्या ताफ्यात पुन्हा सामील करून घेतले.

दीपक चाहर साठी चेन्नईने लावली बोली

चाहरला विकत घेण्यासाठी बऱ्याच संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. तो या हंगामात २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी त्याला विकत घेण्यासाठी बोली लावल्या. त्यानंतर या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी घेतली. मात्र चेन्नईने बाजी मारत त्याच्यासाठी 14 कोटींची बोली लावली.

चेन्नईने आजवर कोणत्या गोलंदाजासाठी लावलेली ही सर्वात मोठी बोली आहे. विशेष म्हणजे, चेन्नईनेच २०१८ मध्ये दीपक चाहरला ८० लाखांना विकत घेतले होते. परंतु आता त्याची किंमत कोटींमध्ये गेली आहे.