गोल्डमॅन संगितकार आणि गायक बप्पी लाहिरी यांचे निधन

0
152

जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बॉलिवुड आणि बप्पीदा
वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. 80 च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळं त्यांना डिस्को किंग असं म्हटलं जात होतं. बॉलीवूडमध्ये संगीत डिजीटल बनवण्यात बप्पीदा यांचं मोठं योगदान होतं. बप्पी लाहिरी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं.

1970 आणि 80च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लाहिरींनी संगीत दिलं होतं. चलते – चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल या सिनेमांमधली त्यांची गाणी गाजली. शराबी चित्रपटासाठी बप्पी लहरी यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसंच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. 2020 साली आलेल्या बागी 3 सिनेमामधलं ‘भंकस’ हे त्यांचं शेवटचं गाणं ठरलं.

डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचं वैशिष्ट्य होतं. डिस्को डान्सर सिनेमातलं ‘आय अॅम अ डिस्को डान्सर’ थानेदार सिनेमातलं ‘तम्मा – तम्मा’, द डर्टी पिक्चरमधलं ‘ऊलाला ऊलाला’, साहेब मधलं ‘यार बिना चैन कहाँ रे’ ही गाणी गाजली.

पश्चिम बंगालमध्ये जन्म

बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. ते बंगाली ब्राह्मण कुटुंबातील होते. बप्पी लहरी यांनी बंगाली चित्रपट दादू (1972) मधून आपले करिअर सुरू केले होते. तर त्यांनी ‘नन्हा शिकारी’ (1973) या हिंदी चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला होता. त्यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. ताहिर हुसैन यांचा हिंदी चित्रपट ‘जख्मी’ने (1975) बप्पी लहरी यांना बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून दिले. बप्पी दा यांच्या आवाजाचे आजही लाखो फॅन्स आहेत. आजही त्यांच्या गाण्यांवर संपूर्ण जग थिरकते. बप्पीदा हे बॉलिवूडमधील पहिले सिंगर आहेत की, त्यांनी प्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सनला आपल्या शोमध्ये निमंत्रित केले होते..

भाजपच्या तिकीटावर निवडणूक
बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार घोषित करण्यात आले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.

बप्पीदांना सोनं का आवडायचं?
बप्पीदांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, हातात अंगठ्या असं मोठ्या प्रमाणावर सोनं त्यांनी नेहमी परिधान केलेलं असे. ‘सोनं माझ्यासाठी लकी आहे असं मला वाटतं’, असं यामागचं कारण सांगताना बप्पीदा म्हणाले होते. बीबीसीबरोबर बोलताना बप्पीदा यांनी सोनं परिधान करण्यामागचं कारण सांगितलं होतं. “सुरुवातीला माझ्या गळ्यात दोन चेन होत्या. त्यानंतर सोनं माझ्यासाठी लकी आहे, असं मला जाणवू लागलं होतं. हिरे मात्र मला लकी नाहीत, सोनं माझ्यासाठी लकी आहे, हे मला माहिती होतं.” तसंच बप्पीदांच्या हातात एक कडंही आहे. तेही लकी असल्याचं बप्पीदांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. जख्मी हा पहिला चित्रपट हिट झाला तेव्हा, त्यांच्या आई वडिलांनी सुवर्ण मंदिर इथून घेऊन बप्पीदांना ते कडं घातलं होतं, असं त्यांनी एका शोमध्ये सांगितलं होतं.