४० वर्षानंतर दुसऱ्यांदा भारत भूषवणार ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद

0
135

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. या काळात कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. आता २०२३ मध्ये, भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे, तर ही बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १३९ व्या बैठकीत भारताकडून अभिनव बिंद्रा, नरिंदर बत्रा आणि नीता अंबानी सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अभिनव हा भारताचा पहिला खेळाडू आहे. बत्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत, तर नीता अंबानी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आहेत. भारताचे क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूरही या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांचे या बैठकीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल ट्विट करत आभार मानले आहेत. त्यांनी लिहले की, २०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी सेशनचे आयोजन करणे, ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही, तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन चार दशकांनंतर भारतात होणार आहे. १९८३ मध्ये शेवटचा कार्यक्रम झाला होता. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात.