लेगस्पिनच्या बादशहाला अलविदा: माजी क्रिकेटपटू फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचे निधन

0
724

क्रिकेटप्रेमींना आज एक मोठा धक्का बसला आहे याचे कारण आहे फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखले जायचे तो शेन वॉर्न आज आपल्यामधून निघून गेला आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे निधन झाले. याबाबतची माहिती वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी दिली आहे. थायलंडमधील एका व्हिलामध्ये शेन वॉर्न होता, जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. शेन वॉर्नच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.

शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न हा जगातील महान स्पिनर मानला जात होता. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती.

२००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत ७०८ तर वनडेत २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.

13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेल्या शेन वॉर्न यांनी 1992 मध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्या कसोटीत त्यांनी केवळ 2 विकेट मिळवल्या. मात्र त्यानंतर त्यांना रोखणे कठीण झाले आणि प्रत्येक फलंदाज त्यांच्या फिरकीच्या तालावर नाचत राहिला. त्यांच्या जवळपास 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वॉर्न सर्वाधिक विकेट घेणार्‍यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या 145 कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) यांच्या मागे दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले होते. त्यांनी 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट्स घेतल्या. 1999 च्या विश्वचषक फायनलमध्ये ते सामनावीर ठरले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले.

सचिनचा कट्टर प्रतिस्पर्धी असणारा शेन भारतीय क्रिकेटमध्येही चांगलाच सक्रीय होता. सर्वात पहिली आयपीएल ट्रॉफी शेन कर्णधार असणाऱ्या राजस्थान रॉयल्सनेच उचलली होती. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे.

वॉर्नच्या नावावर अजूनही क्रिकेट विश्वातील शतकातील सर्वोत्तम चेंडूची नोंद आहे. हा चेंडू नेमका कसा होता आणि त्याने फलंदजाला कसं बाद केलं, याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. मँचेस्टर येथे सामना सुरु असताना ही गोष्ट २४ वर्षांपूर्वी घडल्याचे पाहायला मिळाले. शेन वॉर्न आपले पहिलेच षटक घेऊन येत होता. त्यावेळी फलंदाजीला इंग्लंडचे महान खेळाडू माइक गेटींग होते. वॉर्नने टाकलेला हा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर पडला आणि तिथून चक्क ९० डीग्रीमध्ये तो वळला आणि थेट ऑफ स्टम्प उखडला गेला. आतापर्यंत असा चेंडू कधीही पाहण्यात आला नव्हता. आपण बाद झालो, यावर गेटींग यांना विश्वास बसत नव्हता. काही काळ ते तिथेच खेळपट्टीवर उभे राहिले होते. हा चेंडू  ‘बॉल ऑप्स द सेंच्युरी’ ठरला.