पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष; बुलडोजर वरून साखर आणि पेढे वाटून जल्लोष तर काही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी

0
317

पाच राज्यातील निवडणूकीच्या निकालांमध्ये ४ राज्यात भाजपने चमकदार कामगिरी केलीये.त्यामुळे पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद साजरा केला. पुण्यातील नळ स्टॉप येथे गिरीश खत्री आणि मित्र परिवार कार्यकर्त्यांनी बुलडोजर वरून साखर आणि पेढे वाटप केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला. उत्तर प्रदेश, गोवा ,मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक मते मिळाली असून भाजप उमेदवारांची संख्या प्रथम क्रमांकावर राहिली आहे.

देशभरात पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशाबद्दल पुण्यातील भाजपा कार्यालया बाहेर लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. ‘युपी,गोवा झाकी है,महाराष्ट्र अभी बाकी है’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते गिरीष खत्री म्हणाले, विरोधकांनी जो प्रचार केला होता की योगी आदित्यनाथ बुलडोजर वाले आहेत, तर आता जनतेने योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सांगितलं आहे की तुम्ही असंच अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आपला बुलडोजर चालू द्या आणि विकासकामं सुरू ठेवा, हेच जनतेने मतदानाच्या माध्यमातून सांगितलं आहे. पुण्यातील भाजप कार्यकर्तेनी मंगला टॉकीज जवळील भाजप कार्यालयाबाहेर एकत्र जमून जल्लोष साजरा करत एकमेकांना लाडू भरवले.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. महापौर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबाबत पोस्ट करत ‘ राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी’ असा संदेश दिला आहे. सोबतच त्यांनी योगी आदिथयनाथ यांचा विजयी मुद्रेतील फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

पुण्यामध्ये ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी आज एकप्रकारे उत्सव साजरा केला. काही ठिकाणी मिठाई वाटत तर काही ठिकाणी जोरदार घोषणाबाजीही यावेळी पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टीने अभुतपुर्व यश मिळवले असून पुणे महानगरपालिका निवडणूक दृष्टीने पुणे भाजपामध्ये एकप्रकारचा उत्साह संचारला आहे.