पहिली ते आठवी-नववीच्या अनेक परीक्षा पूर्ण होत असतानाच शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांना मिळणारी उन्हाळी सुट्टी लांबणीवर पडणार आहे. तर उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली नसून त्या सुट्ट्या मे आणि जूनमध्ये असणार आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम पुर्ण झाला नाही त्याच शाळा सुरू राहतील, असंही मांढरे यावेळी म्हणालेत. यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना रविवारी देण्यात येणारी आठवडी सुटी आणि शनिवारची हाफ सुटी देखील रद्द करण्यात आली आहे. रविवारी ज्या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्याची इच्छा असेल ते विद्यार्थी वर्गात बसू शकतात असे सांगण्यात आले आहे.
त्यामध्ये राज्यातील पहिली ते नववी-अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. त्यात रविवारी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक असून त्यासाठी आवश्यकता भासल्यास संस्था आपल्या शाळा सुरू ठेवू शकतील.
निकालही लांबणीवर
काळात विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यावर भर देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होतील. तसेच निकाल मे महिन्यात जाहीर केला जाईल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होत नाही, मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे.
पालकांना अडचणीत टाकणारे आदेश
दरवर्षीप्रमाणे शालेय कामकाजाच्या नियोजनानुसार २० मार्चनंतर शाळांच्या तोंडी, प्रात्यक्षिक व वार्षिक लेखी परीक्षांची सुरुवात होते. अगोदरचे नियोजन गृहीत धरून अभ्यासक्रम पूर्ण केला गेला आहे. आता परीक्षा सुरू झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे साधारण १५ एप्रिलपर्यंत शाळांचे मूल्यमापन आणि ३० एप्रिलपर्यंत निकाल घोषित होतो. अशा स्थितीत शालेय शिक्षण विभागाने दिलेले आदेश राज्यातील शाळा, शिक्षक व पालकांना अडचणीत टाकणारे आहेत, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.