No Mask In Maharashtra : राज्यातील निर्बंध उठवले; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

0
137

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील मास्कची सक्ती सुद्धा उठवण्यात आली आहे. राज्यातील निर्बंध उठवल्यामुळे आता गुढीपाडव्याला मिरवणुका आणि शोभायात्रा काढता येणार आहेत.

राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गुढीपाडवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी मास्कचा वापर करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

लसीकरण पूर्ण होणे गरजेचे
दोन डोसची अट जरी हटवण्यात आली असली तरी गाफील राहून चालणार नाही, आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागेल. पूर्ण निष्काळजीपणे वागून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपलं लसीकरण पूर्ण करून घ्या, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बजावले आहे. महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला काळजी आणि खबरादारी ही घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.