येत्या 1 एप्रिलपासून पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

0
114

पुण्यात दुचाकीवरून प्रवास करताना 1 एप्रिलपासून हेल्मेटसक्ती प्रशासनाचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यात 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं असून हेल्मेटसक्तीचं उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा, यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दुचाकीचा वापर करणान्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आलं आहे.

रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट अधिक असतो. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांपैकी 62 टक्के व्यक्तींचा डोक्यावर इजा झाल्याने मृत्यू झाला आहे. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्के आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक
मोटार वाहन कायद्यानुसार 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. सबब याद्वारे पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा, यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दुचाकीचा वापर करणान्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की, शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी यांचे आद्यकर्तव्य आहे. जनतेस मार्गदर्शक ठरावे यादृष्टीने तसेच स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयात येताना जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी दुचाकी वाहन वापरतांना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी/कर्मचारी/नागरीक हे मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 129 चे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल असे आदेश देण्यात येत आहेत.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे. सुरक्षिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणार आहे. यापूर्वी अनेकदा पुण्यात हेल्मेट सक्तीची घोषणा झाली व त्यानंतर काही दिवस कारवाया झाल्या, मात्र हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी आतापार्यंत केराची टोपली दाखवली आहे.

हेल्मेट स्वरक्षणासाठी
वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. दुचाकीवरून जाताना झालेली किरकोळ चूक जीवघेणी ठरू शकते. त्यामुळेच डोक्याला संरक्षण देणारे हेल्मेट असले पाहिजे. हेल्मेट परिधान केल्यानंतरही दुखापत होणारच नाही, याची शाश्वती अर्थातच नसते. किमान काळजी घेण्याचा भाग म्हणून हेल्मेटचा वापर केला जातो. हेल्मेटमुळे जीव वाचण्याचे प्रमाण जास्त असल्याची सबळ आकडेवारी उपलब्ध आहे. खरे तर हेल्मेट स्वरक्षणासाठी आहे. त्याकडे सक्तीच्या नजरेतून न पाहता गरज म्हणून पाहावे.