अलविदा केके : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक केके यांचे निधन

0
212

‘हम रहे या ना रहे कल…’ अवघ्या ५३ व्या वर्षी बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक केके म्हणजे कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचं असं अकाली जाणं प्रत्येकालाच निःशब्द करून गेलं. केके यांच मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास निधन झालं. रिपोर्टनुसार, KK यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. केकेच्या असे अचानक जाण्याने खरोखरच बॉलिवूडला खूप मोठा धक्का दिला आहे. त्याच्या जाण्याने (Singer KK death) संगीतसृष्टीमध्ये न भरता येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत जन्मलेले प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना इंडस्ट्रीत केके या नावाने ओळखले जाते. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे 35,000 जिंगल्स गायल्या.

अगदी ब्लूटूथच्या जमान्यातील या गायकाच्या आवाजाची जादू एवढी जबरदस्त होती की फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथ आणि सोबतच मराठी इंडस्ट्रीला सुद्धा त्याचा आवाज हवाहवासा वाटायचा. केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणना होत असे. त्यांनी अनेक भारतीय भाषांमधील गीतांना आपला आवाज दिला आहे. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रहे’ हे केकेंचे गाणे गाजले. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसह पार्टी साँगपर्यंतची सर्व गाणी गायली आहेत.

1999 मध्ये आलेल्या पल नावाच्या अल्बमच्या माध्यमातून केके नावाच्या गायकाची ओळख आपल्याला झाली. कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके यांनी या गाण्याआधी हजारो जिंगल्स गायल्या होत्या. याद आयेंगे पल या गाण्याने त्यांनी थेट चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलं. स्निग्ध आवाजाने त्यांनी शब्दांना वेगळाच आयाम दिला. तडप तडप के इस दिल से आह निकलती रही या गाण्याने त्यांनी प्रेमभंग झालेल्या मंडळींच्या दु:खाला वाचा फोडली.

2000 मध्ये केके यांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप-तडप’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये ‘ओम शांती ओम’मधील ‘आँखों में तेरी’ आणि 2009 मध्ये ‘बचना-ए हसीनो’ मधील ‘खुदा जाने’ या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

३१ मे रोजी कोलकातातील एका कॉन्सर्टमध्ये ते सहभागी झाले होते. त्या कॉन्सर्टचे व्हिडिओ त्यांच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये केके हम रहे या ना रहे कल हे गाणं गाताना दिसत आहे. मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी केके यांनी हे गाणं म्हटलं होतं. या व्हायरल व्हिडिओमुळं त्यांचे चाहते सुन्न झाले आहेत.