IND vs ENG: बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात कुटल्या ३५ धावा; पंत-जाडेजाच्या शतकानंतर बुमराहची फिनिशींग

0
372

२००७ साली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले होते. एका षटकात ३६ धावा करण्याचा पराक्रम युवराजने केला होता. असाच काहीसा पराक्रम आज इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीमध्ये पहायला मिळाला. ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजाने पहिला दिवस गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने फलंदाजी करताना केलेली भन्नाट कामगिरी चर्चेचा विषय ठरली. बुमराहची की विक्रमी कामगिरी ठरली.

एकीकडे पंतने त्याच्या अंदाजात टेस्टमध्ये केलेली टी20 स्टाईल फलंदाजी तर जाडेजाची संयमी खेळी यानेच भारताचा डाव खऱ्या अर्थाने सांभाळला. यावेळी भारताचा कर्णधार आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नाबाद 31 धावांची फिनिशींग केल्यामुळे भारताची धावसंख्या 400 पार गेली.

भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार उडवला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा ठोकण्याचा विक्रम बुमराहने केला आहे. या ओव्हरमध्ये बुमराहने केलेल्या फटकेबाजीचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

 

षटक संपल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी आरडाओरड करुन बुमराहच्या फलंदाजीचं कौतुक केलं. हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडं षटक ठरलं. बुमराहची ही खेळी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरुन बुमराहचा फोटो पोस्ट करत, “हा बुमराह आहे की युवराज?… २००७ च्या आठवणी ताज्या झाल्या,” असं म्हटलंय.