गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधाविना; यंदा सर्वच सण धुमधडाक्यात साजरे होणार

0
334

कोरोनामुळे दोन वर्ष सर्व सण-उत्सववार निर्बंध होते, इच्छा असूनदेखील उत्सव साजरे करता आले नाहीत. उत्सवांवर मर्यादा होत्या. परंतु या वर्षी सर्व मंडळाचा उत्साह आणि गेले दोन वर्षांची मर्यादा लक्षात घेऊन यंदा दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम उत्साहात साजरे करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सणांवर कसलेही निर्बंध नसून, सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. आज गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत हे निर्णय़ घेण्यात आले आहेत. गणेशोत्सव साजरी करताना आगमनाच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करताना काही नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. मुंबईतील नियमावली संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहेत. कोविडमुळे मूर्त्यांच्या उंचीवर मर्यादा होती, ती मर्यादा यावेळी काढली आहे. तसेच मंडळ नोंदणीमध्ये सूट देण्यात आली आहे.

सणांच्या काळात ज्यांच्यावर यासंबंधी काही छोटे-मोठे गुन्हे दाखल झाले होते, ध्वनिप्रदूषणासंबंधी ज्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते, त्यासंबंधीत अभ्यास करुन शक्य ते गुन्हे मागे घेण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोविडच्या काळात आपल्याला गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावेळी त्यावरील निर्बंध मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश
राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे. यंदा 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे.