68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) आज (22 जुलै) घोषणा झाली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर बेस्ट फिचर फिल्ममध्ये मराठीत ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि हिंदीत आशुतोष गोवारिकर प्रोडक्शनचा ‘तुलसीदार ज्युनियर’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दोन अभिनेत्यांना विभागून देण्यात आला आहे. ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता सूर्याला ‘सोरारई पोटरु’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या भूमिका असेलल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुसस्कार जाहीर झालाय. तर यंदाचा राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अभिनेत्री नेहा पेंडसे हिनं निर्मिती केलेल्या जून या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालाय. तर गोदाकाठ आणि अवांछित या दोन चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.
माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर केले जातात. या पुरस्कारांची घोषणा तसेच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन या सर्वांची जबाबदारी डायरेक्ट्रेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल (DFF) या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या एका शाखेवर सोपवलेली असते. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.
काय आहे पुरस्काराचे स्वरूप?
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक विभागासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी त्यांची नावे आहेत. काही पुरस्कारात रोख रक्कम दिली जाते, तर काहींमध्ये केवळ मेडल दिले जाते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शाल प्रदान केली जाते. तर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार ज्यांना मिळतो, त्यांना सुवर्ण कमळ आणि अडीच लाख रुपयांची रक्कम प्रदान करण्यात येते. बऱ्याच विभागांमध्ये रौप्य कमळ व दीड लाख रुपयांची रक्कम, पुरस्कारार्थ देण्यात येते.
कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतात राष्ट्रीय पुरस्कार?
हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. मात्र काही वर्षांपासून हे पुरस्कार उपराष्ट्रपती अथवा माहिती व प्रसारण मंत्री यांच्या हस्ते दिले जात आहेत. 2021 साली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले होते.
कोणाला कोणते पुरस्कार?
गोष्ट एका पैठणीची – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
राहुल देशपांडे – सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन (मी वसंतराव)
विशेष पुरस्कार – सिद्धार्थ मेनन(जून)
विशेष ज्युरी पुरस्कार – किशोर कदम (गोदाकाठ आणि अवांछित)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – फनरल
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अनिश गोसावी (टकाटक)
हिंदीतील पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) : अजय देवगण (तान्हाजी) आणि सुर्या (सोरारई पोटरु)
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: तुलसीदास (आशुतोष गोवारीकर)
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: तान्हाजी : द अनसंग वॉरियर
- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सोरारई पोटरु (तामिळ)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरु)
- सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुंतशीर (सायना)