दही हंडीला खेळाचा दर्जा; मृत्यू झाल्यास 10 लाखांच्या आर्थिक मदतीची तरतूद

0
454

दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याचीही घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य

यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल

इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.

या अटी, शर्ती

  • दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे.
  • न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक.
  • गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी.
  • त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
    गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक.
  • 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
  • मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे.
  • मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.