मुंबई असो की पुणे राज्यातील विविध भागात वडापाव हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रात असा कोणता व्यक्ती नसेल ज्यांने कधी वडापाव खाल्ला नसेल. आज 23 ऑगस्ट हा दिवस वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. अनेक लोकांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. वडापाव हा असा खाद्यपदार्थ आहे जो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणताही नाका असो वा कोपरा त्या ठिकाणी वडापावची गाडी दिसणार नाही असे मुळीच होणार आहे. प्रत्येक कोपऱ्याची शानच असते वडापावची गाडी. असा हा वडापाव आपल्याच देशात नाही तर परदेशात सुद्धा हिट झाला आहे
१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.
सुरुवातीचा काळ…
वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले.
1970 ते 1980 च्या दशकात जेव्हा मुंबईतील कंपन्या बंद पडू लागल्या. मग ते कामगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. ठिकठिकाणी गल्लीबोळात हळुहळू वडा पावाच्या गाड्या लागल्या. याचे बाळासाहेब ठाकरेंनी समर्थन केले. मराठी माणसाने व्यवसायात यावे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे वडापावचा छोटासा व्यवसाय सुरू झाला. त्याचवेळी शिवसेनेने दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिवसेनेने मुंबईतील दादर, माटुंगा यांसारख्या भागातील उडपी हॉटेल्समध्ये दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा निषेध करण्यासाठी वडा पावाचा प्रचार सुरू केला. उडपीऐवजी वडापाव खायला सुरुवात केली. शिवसेनेने वडापावला राजकीय पातळीवर ब्रँड केले. अशा प्रकारे शिव वडापावचा जन्म झाला.
विदेशातही प्रसिद्ध आहे वडापाव
वडा पाव केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात खायला मिळेल. एवढेच नाही तर विदेशामध्ये देखील वडापाव तुम्हाला खायला मिळेल. मुंबईच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2010 मध्ये लंडनमध्ये वडापावची सुरुवात केली होती. दोन मित्रांनी मिळून ही हॉटेल सुरु केली होती. आज ते दरवर्षी 4 कोटींपेक्षा जास्त कमावतात.