गुळाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक

0
702

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. त्यातल्या त्यात थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. चला बघूया या बहुगुणी गुळाचे फायदे.

१. नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाच्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

२. गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठय़ा प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.

३. दूध आणि गूळ दोन्हीही त्वचा आणि केसांच्या सुंदरतेत महत्वाची भूमिका निभावतात. जर ह्या दोन्हीचे मिश्रण तुम्ही आहारात समाविष्ट केले तर तुम्ही चमकदार आणि तजेलदार त्वचे सोबत लांब मजबूत केसं सुद्धा मिळवू शकतात.

४. गुळाचे सेवन पचनक्रिया वाढवते. ज्यांना अपचन, आतड्यांचे आजार, अतिसार सारख्या समस्यांनी त्रासलेले असतात त्यांच्यासाठी गुळाचे सेवन हा एक चांगला पर्याय आहे. गुळाचे सेवन तुमची पचनक्रिया आणि आतड्यांच्या कार्यांना नियंत्रित करते.

५. साखर ही फक्त गोडवा देते आणि एक आधुनिक प्रकार आहे. मात्र गुळात नैसर्गिकता जास्त असल्यामुळे तो शरीराला हळूहळू आणि दीर्घ काळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनतात.

६. मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीवर गुळ खूप गुणकारी आहे. त्याचे सेवन हे सर्व दुखणे कमी करण्यास मदत करतात. ओटीपोटातील दुखणे, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर गुळ हा सोपा आणि स्वस्थ उपाय आहे.

७. आपल्या बालपणीपासून आपण ऐकतोय कि मजबूत हाडांसाठी दूध हे सर्वात चांगला उपाय आहे. दुधासोबत गूळ सुद्धा हाडं आणि मांसपेशींना पोषण देण्यास मदत करतात. हा सल्ला नेहमी दिला जातो, गुळासोबत दूध घेतल्याने सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या कमी करतात.

८. साधारण सर्दी-खोकला झाला असल्यास गुळाच्या चहाने किंवा गुळ मिश्रित गरम पाणी पिल्याने आराम पडतो. रात्री झोपण्याआधी गुळ चोखून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळेल.

९. गुळात कुठल्याही अ‍ॅलर्जी विरुद्ध लढणारी तत्त्वे असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.

१०. गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात तसेच गरम दूध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दूर होतात.