राष्ट्रीय मतदार दिवस: मतदार राजा जागा हो; काय आहे मतदार दिनाचं महत्त्वं?

0
779

भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्यानं गौरव केला जातो. त्या लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार. म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी तसेच नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदणी करावी, या गोष्टींची जनजागृती होण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

2011 पासून या दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी 25 जानेवारीला हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवशी सहसा विविध राजकीय पक्ष आणि केंद्राकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत ओघाओघानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा फायदाही नागरिकांना होतो. पण, अनेकांनाच याबाबची माहितीही नसते.

मतदानाचा अधिकार

भारतात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. कोणत्याही अधिकाराला धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव करत या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो!!!. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया!!! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.

लोकशाहीमध्ये प्रत्येक मत मौल्यवान आहे. एका-एका मतानं इथे विरोधक जिंकतात आणि सत्ताधीश कोसळतात. म्हणूनच अरुणाचल प्रदेशमध्ये एका मतदारसंघात असंही एक मतदान केंद्र उभं करण्यात आलं होतं. जिथं फक्त एकच मतदाराची नोंद करण्यात आली आहे. हयुलियांग मतदारसंघातील हे केंद्र देशातल सर्वात छोटं मतदार केंद्र होतं.

पोस्टाद्वारे मत नोंदवण्याचा अधिकार

मतदान केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी निवडणूक आयोगाकडून पोस्टल वोटींग अर्थात पोस्टाद्वारे मतदान करण्याची सोय करण्यात येते. यामध्ये निवडणूक प्रक्रियेती कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेच्या सेवेतील कर्मचारी यांचा समावेश असतो.

लोकशाहीत सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे ती ‘सहभागाची’! दुर्दैवानं अनेकांना असं वाटतं की, जनता आणि लोकप्रतिनिधी हे दोन परस्परांपेक्षा भिन्न आणि संपूर्णत: स्वतंत्र असे घटक आहेत. वास्तवात लोकशाहीच काय, पण कोणतीही राज्यपद्धती ही नागरिकांच्या सहभागाशिवाय चालू शकत नाही. हा सहभाग निव्वळ ‘मत’ देणं आणि व्यक्त करणं एव्हढ्यापुरता मर्यादित नाही. स्थानिक नगरसेवकाकडे महत्त्वाचे प्रश्न नेण्यापासून ते प्रसंगी शासननिर्णयाविरुद्ध आंदोलनात सहभागी होण्यापर्यंत आपल्या सर्वांना लोकशाहीत नियमित सामील व्हायला हवं