तुमचं आणि तुमच्या कुटुंबीयांच्या उत्तम भविष्यासाठी गुंतवणूक हा योग्य पर्याय आहे. पण, कुठे आणि कशी गुंतवणूक करावी? हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. याचं प्रश्नाचं उत्तम उत्तर आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणजे ‘पोस्ट. अनेकांना कोरोनाच्या संकटात गुंतवणुकीची चिंता सतावत आहे. कुठल्या योजनेत गुंतवणूक करायची, याचाच विचार बरेच जण करत असतात. काही जण बँकेत गुंतवणूक करणाऱ्या प्राधान्य देतात. पोस्टातील योजनेत(Post office Scheme) गुंतवणूक करणं हे जास्त फायद्याचं ठरत आहे. पोस्टात केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला मोठा लाभ मिळतो.आम्ही तुम्हाला देतोय पोस्ट गुंतवणुकीच्या काही पर्यायांची माहिती… यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळतेच शिवाय गुंतवणुकीचे उत्तम रिटर्न्सही तुमच्या हाती पडतात.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 6.8 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत आपण 100 रुपये गुंतवू शकता. तसेच 100 रुपयांनंतर या योजनेत गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. पाच वर्षांनंतर व्याजासहीत तुमचे पैसे तुमच्या हातात पडतात.
पोस्ट ऑफिस मुदत ठेव (FD)
पोस्ट ऑफिस मुदत ठेवीमध्ये (FD) आपण ठराविक मुदतीसाठी एकमुखी रक्कम गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव या योजनेत एक ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव:
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (आरडी) खाते भारतात राहणाऱ्या व्यक्तीलाच उघडता येते. किमान रू. 10 दर महिना आणि त्या नंतर रु. ५ च्या पटीत आपण ठेव यामध्ये ठेऊ शकतो. कमाल मर्यादा या योजनेमध्ये नाही. त्याचबरोबर व्याज हे तिमाही चक्रवाढ आधारावर आहे. संपूर्ण रक्कम व्याजासह मुदतपुर्तीला दिली जाते. या ठेवीवरील व्याज मात्र करपात्र आहे.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर 7.6 टक्के केले आहे. या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेला कलम 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.
किसान विकास पत्र (KVP)
अल्प प्रमाणात गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या बचत योजनेवर आता 6.9 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास अधिक चांगला परतावा मिळतो. या योजनेत प्रथम 113 महिन्यांचा परिपक्व कालावधी होता. आता तो वाढवून 124 महिन्यांचा करण्यात आला आहे. किसान विकास पत्रात किमान 1000 रुपये जमा करावे लागतात
वरिष्ठ नागरिक बचत योजना(SCSS)
60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकतात. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात आपण जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर आपल्याला वर्षाला 7.4 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते.