हॉलमार्क म्हणजे नक्की काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी कसा फायदा? जाणून घ्या

0
1416

भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. सोने खरेदीवेळी अनेकांची गुणवत्तेत फसवणूकही केली जाते. त्यामुळे शुद्ध सोने कसं ओळखायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. सोन्याच्या खरेदीत ग्राहकांसोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने अनेक नियम बनविले आहेत.

सोनं किती शुध्द आहे हे नक्की करण्यासाठीची पारंपारीक पध्दत म्हणजे त्याचा कस मोजणे. कस मोजायचा एक दगड सोनाराकडे असतो, त्याला “कसोटी”चा पत्थर असं म्हटलं जातं. या दगडावर सोन्याचा नग घासला जातो आणि त्यावर अ‍ॅसिडचे काही थेंब टाकले की सोनाराला नग किती कॅरेट सोन्याचा आहे हे कळतं. ही पध्दत पारंपारीक आहे आणि सोनार जितका कसलेला असेल, तितका त्याचा अंदाज बरोबर असतो. थोडक्यात ही कसोटी व्यक्तिसापेक्ष आहे.

हॉलमार्क म्हणजे काय?
सोन्यासाठी हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसद्वारे याची निश्चितता केली जाते. हे सोन्याच्या गुणवत्तेची पातळी तपासते. तसेच दागिने किंवा सोन्याच्या नाण्याच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळांना परवाना दिला जातो. सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग असणे आवश्यक असते. त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही याची निश्चित चाचपणी करा.

हॉलमार्क कसा ओळखालं?
सोन्याच्या हॉलमार्कमध्ये बीआयएसचे त्रिकोणी चिन्ह असते. तसेच, त्यावर हॉलमार्किंग केंद्राची एक खूण असते. त्यासोबतच सोन्याची शुद्धता, तो सोन्याचा दागिना कधी बनवला आहे, हे देखील त्यावर लिहिलेले असते.

सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यावर केली जाते. हॉलमार्किंगमध्ये चार गोष्टींचा समावेश आहे. ज्यामध्ये बीआयएसचा मार्क, शुद्धता सारखे 22 कॅरेट आणि 916, असेसिंग सेंटरची ओळख आणि सराफांच्या ओळखीचे चिन्ह याचा समावेश असणार आहे.

दागिन्यांवर शुद्धतेचे प्रमाणपत्र
प्रत्येक दागिने किंवा नाण्यावर त्याची शुद्धता लिहिलेली असते. 99 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले आहे. तर 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 आणि 21 कॅरेट सोन्याचे 875 असे लिहिलेले असते. या व्यतिरिक्त 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 आणि 14 कॅरेट दागिन्यांवर 585 असे लिहिलेले असते.

हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा
जर एखाद्या व्यापाऱ्याने हॉलमार्कऐवजी स्वस्त दागिने देण्याची ऑफर दिली असेल तर ती ऑफर स्विकारु नका. तज्ञांच्या मते, प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्क करण्याची किंमत केवळ 35 रुपये असते. म्हणजेच, हॉलमार्क केलेले आणि नॉन-हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या किंमतीत सहसा कोणताही फरक नसतो. पण हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत गडबड असू शकते.

कोणतेही दागिने घेताना त्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आवर्जून घ्या. त्यात सोन्याची गुणवत्ता लिहिली आहे की नाही हे तपासा. तसेच त्या दागिन्यांमध्ये काही रत्ने जोडलेले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक घ्या.

हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करण्याचे बरेच फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे सोन्याच्या शुद्धतेसह अडथळा येण्याची शक्यता कमी असते. तसेच जर तुम्ही दागदागिने विकायला गेलात तर त्यामध्ये कोणतेही डेप्रिसिएशन कॉस्ट कमी केली जात नाही. म्हणजेच तुम्हाला सोन्याची योग्य किंमत मिळेल.

हॉलमार्कच्या नगावर पाच चिन्हे असातात

१. बीआयएसचा लोगो
२. कॅरेटचा आकडा (उदाहरणार्थ:२२़़K  वगैरे )
३. अ‍ॅसे (परीक्षण) करणार्‍या संस्थेचे चिन्ह ४ घडणावळीचे  वर्ष
५.  सोनार किंवा पेढीचा लोगो.