नामकरण :संभाजी विडीचे नाव आता ‘साबळे विडी’

0
593

साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. संभाजी बिडीचे (Sambhaji Bidi) नाव बदलावे या मागणीसाठी अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेड, अनेक शिवप्रेमी संघटना आणि काही राजकीय संघटना प्रयत्न करत आहेत.याची पूर्वीच घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष बदल आता झाला आहे. संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले आहे. नगरच्या केडगाव येथील कंपनीत नवीन नावाच्या पॅकिंगचे अनावरण नुकतेच करण्यात आले.

साबळे वाघीरे आणि कंपनी १९३२ पासून विडी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. १९५८ पासून कंपनीने संभाजी विडी नावाने उत्पादन सुरु केले होते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडीला नको म्हणून संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ही मागणी घेऊन आंदोलनही करण्यात आले होते. अखेर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे.

या निर्णयाचं शिवभक्तांकडून आणि नागरिकांकडूनही स्वागत होत आहे. “छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या आपल्या सर्वांच्याच भावनांचा आदर ठेवून ‘साबळे वाघिरे आणि कंपनी’ने आपल्या विडीचं पूर्वीचं नाव बदलून ‘साबळे बिडी’ केलं. याबद्दल कंपनीचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिली आहे.

पुण्यात स्वारगेट पुणे येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. महाराष्ट्र व आंध्रप्रदेशात या विडीचे उत्पादन केले जाते. नगर शहरात मागील ७० वर्षांपासून या कंपनी विडीचे उत्पादन सुरू आहे. नव्या नावाचे अनावरण तेथे करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक बाबू शांतय्या स्वामी, लाल बावटा विडी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्यालपेल्ली, इंटकचे शंकरराव मंगलारप, विनायक मच्चा उपस्थित होते.