फोन टॅपिंग म्हणजे नक्की काय असते रे भाऊ?

0
580

‘फोन टॅपिंग…’ या दोन शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. पण फोन टॅपिंग म्हणजे काय? तर फोन टॅपिंग म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्या फोनवरील संभाषण ऐकणे किंवा त्याचं रेकॉंर्डिंग करणे होय. त्यामुळे एखाद्याची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.

फोन टॅपिंग म्हणजे काय?
फोन टॅपिंगचा अगदी सोप्या शब्दात अर्थ सांगायचा म्हणजे इंटरनेटद्वारे झालेलं किंवा फोन द्वारे झालेलं संभाषण एका तिसऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड करणं. टेलिफोन रेकॉर्डरचा शोध लागल्यानंतर 1890 मध्ये अमेरिकेत फोन टॅपिंगची पहिल्यांदा सुरुवात झाली. गेल्या काही वर्षात वरिष्ठ नेत्यांचे फोन टॅप झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हा विषय जोरदार चर्चेत आहे. दोन व्यक्तींमधील फोनवरील संभाषण तिसऱ्या व्यक्तीनं कोणतीही सूचना न देता ऐकणं यालाच फोन टॅपिंग असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या मित्राशी फोनवरून संवाद साधत असताना तिसरी व्यक्ती (Third Person) तुमच्या परवानगीशिवाय, सूचना न देता तुमचा कॉल रेकॉर्ड करते, त्याला फोन टॅपिंग म्हणतात. याला वायर टॅपिंग किंवा लाइन बगिंग असंही म्हणतात.

कशी होते फोन टॅपिंग

पूर्वी लँडलाईनच्या काळात फोन टॅपिंग करणं अत्यंत सोपं होतं. रेडिओ स्कॅनरच्या मदतीने सहजपणे फोन टॅप केला जायचा. रेडिओ स्कॅनर अनेक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काम करण्यास सक्षम असायचा. त्यामुळे टेलिफोनवर होणारी चर्चा रेडिओ स्कॅनरमध्ये लावण्यात आलेल्या मायक्रोफोनच्या मदतीने ऐकणं शक्य होतं. आता स्मार्टफोन कोणत्याही लाईनवर नाही तर ट्रान्समिशन आणि डिजीटल एन्कोडिंगवर आधारीत आहे. त्यामुळे स्मार्टफोनवरील संभाषण टॅप करणं कोणत्याही बाहेरच्या व्यक्तिला शक्य नाही. केवळ टेलिकॉम कंपन्याच फोन टॅप करू शकतात. तेही सरकारचे आदेश असतील तरच.

कोण करू शकतात फोन टॅप?

मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र एटीएस आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागाला फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) यांची परवानगी लागते.

फोन टॅपिंग गुन्हा आहे का?

होय, परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं हा गुन्हा आहे. वरील यंत्रणांव्यक्तिरिक्त कुणालाही कुणाचा फोन टॅप करता येत नाही. जर एखादी व्यक्ती असं कृत्य करत असेल तर त्याला तुरुंगवास होऊ शकतो. तसेच वरील एजन्सीही देशद्रोह किंवा गंभीर गुन्ह्याचा संशय असलेल्या व्यक्तिंचाच फोन टॅप करतात. कुणाचाही फोन टॅप करण्याची त्यांना परवानगी नाही. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कुणाचाही फोन टॅप केला जात नाही. जर तुमचा कोणी बेकायदेशीररित्या तुमचा फोन टॅप करत असेल तर तुम्ही त्याविरोधात गुन्हा दाखल करू शकता.

भारतात फोन टॅपिंग करणं बेकायदेशीर ( Illegal) आहे. दोन व्यक्तींमधील संवाद तिसरी व्यक्ती विनापरवानगी ऐकत असेल तर असं करणं बेकायदेशीर ठरतं. अगदी सरकार देखील तुमचे फोन कॉल्स रेकॉर्ड करू शकत नाही. परंतु, फोन टॅपिंगबाबत सरकारला (Government) विशेष अधिकार असतात, आणि अपवादात्मक स्थितीत सरकार फोन टॅपिंग करू शकते.

इंडियन टेलिग्राम अॅक्टनुसार, सरकार काही विशिष्ट परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे फोन टॅप करू शकते. या कायद्याच्या कलम (1) आणि (2) नुसार, सार्वजनिक आणीबाणी किंवा सावर्जनिक सुरक्षेचा मुद्दा असल्यास सरकार फोन टॅपिंग करू शकते. मात्र असं करण्यासाठी सरकारलादेखील अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. काही वेळा न्यायालयाच्या परवानगीनंतर फोन टॅपिंग करता येतं. परंतु, एखाद्या व्यक्तीसोबत अशी घटना घडल्यास तो न्यायालयात धाव घेऊ शकतो आणि मानवाधिकार आयोगाकडं (Human Rights Commission) याबाबत तक्रार दाखल करू शकतो.