टीआरपी घोटाळा : टीआरपी म्हणजे काय?

0
584

सध्या अनेक न्युज चॅनल टीआरपीच्या रेसमध्ये आम्हीच पुढे आहोत हे ओरडून ओरडून सांगत आहेत…मात्र हा टीआरपी नक्की काय असतो..तो कसा मोजतात याचा कधी विचार केला आहे का..? मागील काही महिन्यांमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण, ड्रग्स कनेक्शन आणि कंगना-शिवसेना वाद यामुळे रिपब्लिक भारत हे हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिनींच्या सेगमेंटमध्ये बार्कच्या आकडेवारीत टॉपवर होते. म्हणजेच टीव्ही मीडियाचा TRP मोजणाऱ्या BARC कंपनीच्या यादीत रिपब्लिक भारत पहिल्या स्थानावर होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला असून, यात अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचेही नाव आहे. याशिवाय आणखी दोन चॅनेल्स मराठी आहेत.

टीआरपी लोकांना सांगते की कोणता चॅनेल किंवा एखादा कार्यक्रम किती लोकांपर्यंत पोहचत आहे. याशिवाय कोणत्या वयोगटातील लोकांना तो कार्यक्रम आवडत आहे. बार्कसारख्या एजेंसी व्ह्यूवरशिपसाठी ठिकठिकाणी मीटर लावत असते व ही माहिती गोपनीय ठेवते. हे मीटर कोठे लावले आहेत याची माहिती चॅनेल अथवा जाहिरातदारांना देखील माहिती नसते. जेव्हा दर्शक रिमोटने चॅनेल बदलतात किंवा काही वेळ एखादा चॅनेल पाहतात, तेव्हा त्याचे मुल्यांकन टीआरपीमध्ये केले जाते. मात्र जर हे मीटर कोठे लावलेले आहेत, हे सांगितल्यास यात घोटाळा होऊ शकतो.

टीआरपी नक्की काय आहे?

टीआरपीला टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणतात. टीआरपी ही एक असे मुल्यांकन आहे, ज्याद्वारे कोणता कार्यक्रम अथवा चॅनेल सर्वाधिक पाहिला जातो, याची माहिती मिळवली जाते. याद्वारे कोणत्याही कार्यक्रम अथवा चॅनेलची लोकप्रियता जाणून घेण्यास मदत मिळते. चॅनेल अथवा कार्यक्रमाचा टीआरआपी सर्वाधिक आहे, याचा अर्थ लोक तो कार्यक्रम पाहत आहेत. टीआरपीचा डेटा जाहिरातदारांसाठी महत्त्वाचा असतो, कारण जाहिरातदार त्याच कार्यक्रमांना जाहिरात देतात, ज्यांचे रेटिंग जास्त असते.

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी अशा तीन वाहिन्यांची माहिती मिळवली आहे जे उपकरणांबरोबर छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. ही उपकरणे बीएआरसीकडून टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी वापरली जातात. बीएआरसी एका सेटटॉप बॉक्ससारख्या यंत्राच्या मदतीने टीआरपीसंदर्भातील डेटा गोळा करते. वापरकर्ते कोणत्या वाहिन्या पाहतात याची नोंद या यंत्रांच्या माध्यमातून ठेवली जाते. याच आकडेवारीच्या आधारे टीआरपी निश्चित केला जातो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मोजक्या ग्राहकांच्या माध्यमातून कोणत्या वाहिन्या सर्वाधिक काळासाठी पाहिल्या जातात याची आकडेवारी गोळा करुन त्याच्या सरासरीच्या आधारे टीआरपी ठरवला जातो.