कोरोना : शहरासोबतच ग्रामीण भागातील शाळा कॉलेजही बंद

0
476

महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्यातील विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत करोनाला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

महाराष्ट्रातील शहरांमधल्या शाळा, कॉलेज बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता ग्रामीण भागातील शाळा तसेच कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे.शिवाय त्याचबरोबर महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तेसेच, याबाबत निवडणूक आयोगाकडे शिफारसदेखील करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून शहरी आणि ग्रामीण अशा सर्व कॉलेजना हा निर्णय लागू असेल. सर्व प्राध्यापक २६ मार्चपर्यंत वर्क फ्रॉम होम करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील. मात्र दहावी आणि बारावीच्या परिक्षा पुर्ण होणार असल्याचेही देखील टोपे यांनी सांगितले. खाजगी क्लासेस बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.