दहावी-बारावी निकाल : राज्य शिक्षण मंडळाची मोठी घोषणा

0
497

(या दिवशी ठरणार विद्यार्थ्यांचं भवितव्य)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विध्यार्थी आणि पालक वर्गाला पडला होता. त्यात सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेगवेगळ्या तारखेमुळे विध्यार्थी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे.

निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण यमंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी निकालांची ताऱीख समोर आली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यायंवर चर्चा झाल्याचं कळत आहे. ज्यामध्ये सद्यपरिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षण, दहावी, बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया, अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

कोरोना परिस्थितीमुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते.

महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परीक्षा पूर्ण झाली होती. मात्र, 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे.