पहिली ते आठवी परीक्षा रद्द; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

0
361

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने होत असल्याने बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतांना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. यंदा इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्य़ा विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता थेट पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयानुसार, राज्यात शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आज मी आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मला सांगायला पाहिजे की मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो, की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावं आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये.

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी ते होणं शक्य नाही. राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थी जे RTE अंतर्गत त्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. तर 9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील परीक्षा कधी, कशा होणार?

पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द
नववी ते अकरावी – लवकरच निर्णय
दहावीच्या लेखी परीक्षा – 29 एप्रिल ते 20 मे
बारावीच्या लेखी परीक्षा – 23 एप्रिल ते 21 मे