१५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार; परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

0
854

राज्यातील वाढत्या कोरोना आणि नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. असेही सामंत यांनी सांगितले.

परीक्षा ऑनलाईनच होणार!
मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं ते म्हणाले.

वसतीगृह देखील बंद करण्याचे निर्देश
“सर्व विद्यापीठं, महाविद्यालयांशी निगडीक वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन वसतीगृह देखील बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी. पण जे विद्यार्थी परदेशातून आपल्या राज्यात आले आहेत, त्यांची वसतीगृहाची सुविधा मात्र बंद करण्यात येऊ नये”, असं उदय सामंत म्हणाले.

शाळा पुन्हा बंद…

मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर पुणे आणि ठाणे आणि औरंगाबादेतील पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या काळात, ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.