इंजिनिअर्ससाठी खुशखबर; टीसीएस, इन्फोसिस, विप्रोमध्ये महाभरती

0
427

भारतातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी भरती निघाली आहे. कोरोनाचा प्रभाव उतरल्याने बाजारतील मागणीत काही प्रमाणात वाढ झाल्याने या कंपन्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील 2-3 आठवड्यापासून उतरत आहे.

या तिन्ही कंपन्यांनी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या एकूण हेडकाउंटमध्ये अनुक्रमे वाढ झाल्याचे सांगितले आहे. हेडकाउंट वाढणे हे आयटी कंपन्यांच्या वाढीचे एक सकारात्मक निदर्शक मानले जाते. या तिन्ही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नतीही जाहीर केली आहे. दुस-या तिमाहीतील या कंपन्यांची कमाई विश्लेषकांच्या वर्तवलेल्या अपेक्षेपेक्षा पुढे आहे

कोरोनाकाळात TCS ने जवळपास 8 हजार फ्रेशर्सची भरती कंपनीत केली आहे. या भरतीची जवळपास सगळी प्रोसेस ऑनलाईनच झाली आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन कंपनीच्या दुस-या तिमाहीतील कमाईनंतर ही माहिती दिली आहे.

इन्फोसिसचे सीओओ यू. बी. प्रवीण राव म्हणाले, “कंपनीच्या वाढीच्या अनुषंगाने कर्मचारी भरती होईल. या तिमाहीत आम्ही ५,५०० कर्मचाऱ्यांची भरती केली. यांपैकी देश-विदेशातील ३,००० फ्रेशर्स होते आणि २,५०० जण अनुभवी होते. जर तुम्हाला आठवत असेल तर एका तिमाहीत आमची कर्मचाऱ्यांची मागणी खूपच कमी झाली होती आता त्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.”

विप्रोचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख सौरभ गोविल यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,” विप्रो कर्मचारी भरतीबाबत मार्गदर्शन करीत नसली तरी आमच्याकडे कर्मचारी भरती करण्याची सक्षम योजना आहे. बाजाराला आता वेग आला आहे आणि यासाठी आम्ही तयार राहिलं पाहिजे. दुसऱ्या सहामाहीत मोठी कर्मचारी भरती करण्याची आमची योजना आहे. विविध बँडवर आणि प्रादेशिक स्तरावर ही भरती केली जाईल.”