दहावी परीक्षेचे अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीचा आराखडा आणि शिक्षकांसाठीचं वेळापत्रक जाहीर

0
439

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले. मात्र, मूल्यमापन करताना त्यामध्ये स्पष्टता नसल्याने मूल्यमापन नेमके कसे आणि कधी सुरू करायचे? असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. यावर बोर्डाने शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीच्या सूचना देऊन मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेणेकरून या कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुण द्यावे हे यामध्ये जाहीर करण्यात आले आहे.

शासन निर्णयाचे पालन करण्याचे आदेश
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तूनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

निकालासाठी समिती
दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल ,दहावीच्या मूल्यमापनाची कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीच्या पडताळणीनंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. शाळास्तरावर निकालाची तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत होणार आहे.दहावीच्या मूल्यमापनासंदर्भात माध्यमिक बोर्डाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दहावीचा निकाल कसा लावणार?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी आणि 10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होईल, असं म्हटलं होतं.

i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अंतर्गत मूल्यमानाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक नेमके कसे असणार?

10 जून सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान मुख्यध्यापक व शिक्षकांना मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
11 ते 20 जून दरम्यान अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे लागणार शिवाय, विषय शिक्षकांनी गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करावे लागणार आहे.
याच दरम्यान वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करायचा आहे.
तर 12 ते 24 जून या दिवसांमध्ये वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाची निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करायचे आहे.
तर दहा दिवसांत म्हणजेच 21 जून ते 30 जून दरम्यान मुख्याध्यापकांनी समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणाली मध्ये भरायचे आहेत. सोबतच निकालाचे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे म्हणजेच बोर्डाकडे जमा करायचे आहे.