शाळेसोबत कॉलेजचा ही आता नंबर; १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार

0
239

शाळांनंतर आता महाविद्यालयेही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कुलगुरुंशी चर्चा झाली आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होतील, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता दिली आहे, असे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी असणार आहे. विद्यालये सुरू होताना वसतीगृहे सुरू करताना ती टप्प्याटप्प्याने सुरू होतील, असे सामंत म्हणाले. सध्या केवळ ५० टक्के उपस्थितीने महाविद्यालये सुरू होणार असली तरी ५ मार्चनंतर १०० टक्के सुरू करण्याचा विचार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

राज्यात 15 फेब्रुवारीपासून फक्त कॉलेज सुरू होतील. परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागात गेले आहेत त्यांना शिक्षण ऑफलाइन घ्यायचे की ऑनलाईन याचा अधिकार विद्यार्थ्यांना असेल. तसेच स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडिट करूनच वसतीगृहे सुरू होणार आहेत, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

वसतिगृहे सध्या बंदच राहतील
महाविद्यालये सुरू होणार असली तरी वसतिगृहे मात्र सध्या बंदच राहणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील वसतिगृहे की करोना संशयित रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे त्या वसतिगृहांना कोणत्याही प्रकारे धक्का लावता येणार नाही. म्हणूनच तूर्त वसतिगृहे बंद राहतील अशी माहिती सामंत यांनी दिली.

कॉलेजेस सुरू करताना…

  • कॉलेजेस सुरू करण्याचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारी ते ५ मार्च असेल.
  • विद्यापीठे आणि महाविद्यालयांना युजीसीनं या काळात कॉलेजेस सुरू करण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागेल.
  • कॉलेजेसमध्ये वर्गांची विद्यार्थी बसण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार १५ टक्के विद्यार्थी एका दिवशी किंवा एका वेळी वर्गात बसतील, अशा पद्धतीने रोटेशन तत्वानुसार वर्ग घ्यावेत.
  • स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्यास विद्यापीठे किंवा कॉलेजेस सुरू ठेवावीत किंवा नाही, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना असेल. त्यांच्याशी चर्चा करूनच कॉलेजेसनी पुढील निर्णय घ्यावा.
  • मुंबई विद्यापीठात १६ ऑगस्टपासूनच ऑनलाईन कॉलेज सुरू झाले आहेत. बहुतेक विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम नियोजनानुसार सुरू आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा पद्धतीने घेता येतील.
  • प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम जर १५ टक्के ते २० टक्के कमी करण्यासंदर्भात युजीसीकडून गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यापीठ आपल्या स्तरावर निर्णय घेतील.
  • फी कमी करण्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसून ज्या विद्यालयांमध्ये वर्षाच्या सुरुवातीला फी घेतली आहे, ती कमी करण्याचा निर्णय झाल्यास ती फी पुढील वर्षी वापरात येईल.