नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार, शिक्षण विभागाचा निर्णय

0
268

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. करोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांमधील नववी आणि अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत कार्यक्रम आखण्यात येईल व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे शासन विशेष लक्ष देईल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन नको अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होतात किंवा 9 वी 11 वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याबाबतचा निर्णय होतो, मग 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत परीक्षा घेण्यावर सरकार ठाम का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही कोरोना बाधित झालो तर आमचं कुटुंब देखील कोरोना बाधित होऊ शकतं याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या वर्षीही नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी काही शाळांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुत्तीर्ण केले. जे विद्यार्थी अंतर्गत परीक्षा देऊ शकले नव्हते त्यांनाही या निर्णयाचा फटका बसला. त्याचप्रमाणे शुल्क भरले नाही म्हणून शाळा अनुत्तीर्ण करत असल्याच्या तक्रारीही विभागाकडे आल्या होत्या.

अकरावीचे शैक्षणिक वर्ष आताच सुरू
अकरावीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांत परीक्षेला बसवायचे का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला होता. ऑनलाइन वर्गात अद्याप पन्नास ते साठ टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि त्यानंतर शाळा, महाविद्यालयांना मूल्यांकन करण्याची मुभा द्यावी, असे मत एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी व्यक्त केलं होतं.