८वीच्या पुस्तकात गंभीर चूक; सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख

0
419

राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात अक्षम्य चूक झाल्याचे समोर येत आहे. इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन अशा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पुस्तकात ही अक्षम्य चूक करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी निदर्शनास आणले आहे. सुखदेव यांचाच नव्हे तर हा क्रांतिकारकांचा अपमान असल्याचा संताप ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता चुकीचा मजकूर छापलेली सर्व पुस्तके मागे घ्यावीत. तसेच संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी आता ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून आठवीच्या पुस्तकात ही चूक झाली आहे. यापूर्वी सुद्धा पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात अनेक चुका झाल्या आहेत. कधी छपाईतल्या चुका होत्या तर कधी उल्लेख चुकीका केला होता. तेव्हा सुद्धा असेच मुद्दे उपस्थितीत करून आक्षेप घेतला होता. आणि आता आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील ही घोडचूक समोर आली आहे. यामुळेचे यासंबंधित लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा धडा आहे. या धड्यात व्यक्ती शाळकरी मुलांनी देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. यावेळी त्यांच्यातील संवाद धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचालेल्या प्रश्नात हा उल्लेख आहे.

असे आहे चुकीचे छापलेले वाक्य :-
“भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”.

असे वाक्य असणे गरजेचे आहे :-
“भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”

कोण होते कुर्बान हुसेन?
भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी देशासाठी हौतात्म्य स्विकारलं त्याच वेळी म्हणजे १९३१ मध्ये अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांनाही इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून फासावर चढवलं होतं. १२ जानेवारी १९३१ रोजी त्यांना फाशी देण्यात आली. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांचं वय अवघे २२ वर्षे होतं. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.